मुंबई – मुंबईत कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली, त्या पार्श्वभूमीवर मुंबईथील हिंदुजा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी बंद झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हे मेसेज चुकीचे असून अत्यावश्यक उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णसेवा सुरु असून रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याविषयी, हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौतम खन्ना यांनी सांगितले सोशल मीडियावरील माहिती ही चुकीची आहे. सध्या रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र अत्यावश्यक उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग व रुग्णालयात भरती कऱण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचे पूर्ण नियम पाळून त्याप्रमाणे व्यवस्थापन करुन ही सेवा देण्यात येत आहे.
कोरोनाकरिता (कोविड-१९) रुग्णालयातील एक भाग राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या निर्देशांनुसार त्याची २० खाटांची क्षमता असलेला विभाग आहे. यात चार अतिदक्षता कक्ष आणि सामान्य विभाग आहे. तसेच, काही भाग विलगीकरण कक्षासाठी राखीव ठेवण्यात आला आल्याचे डॉ.खन्ना यांनी सांगितले.