मुंबई : ट्रेड युनियन संयुक्त समितीच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुक्टूमार्फत करण्यात आले होते. त्यानुसार, राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून पाठिंबा दर्शविला. सोबत सिंधुदुर्गपासून ते चर्चगेटपर्यंतच्या अनेक महाविद्यालयांतील बुक्टूचे सदस्यांनी आझाद मैदानात उपस्थिती दर्शविली होती. मुंबई ठाण्यातील १०० हून अधिक प्राध्यापकांनी आपली उपस्थिती आझाद मैदानात दर्शविली, तसेच अनेक महाविद्यालयांत जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थही विद्यार्थी - शिक्षकांनी काळ्या फिती बांधलेल्या दिसून आल्या.मुंबईतील चेतना महाविद्यालय, झुनझुनवाला महाविद्यालय, जयहिंद महाविद्यालय, भवन्स, एस. के. सोमैया, रॉयल महाविद्यालय, सेंट अँड्र्यूज महाविद्यालय यांनी काळ्या फिती बांधून संपला पाठिंबा दर्शविला, तसेच जेएनयूमधील हल्ल्याचा निषेधही नोंदविला. राज्यातील देवगड येथील केळकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय, उल्हसनगर येथील आरकेटी महाविद्यालय चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय यांनी संपाला आपला पाठिंबा दर्शविला.मुंबई विद्यापीठातही संघटनांची निदर्शने गेट वे आॅफ इंडियावरून आझाद मैदानात हलविल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आपले व जेएनयू हल्ल्याप्रकरणी निषेध आंदोलन मागे घेतले. मात्र, बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. जेएनयू हल्ल्याचा निषेधासोबत कामगारांच्या देशव्यापी संपालाही त्यांनी आपला पाठिंबा दर्शविला. यामध्ये छात्रभारती, एसएफआय, मसला, एआयएसएफ, एएसयू, पीएसयूसारख्या विद्यार्थी संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. गेट वे आॅफ इंडियावर एकत्र होण्यास मज्जाव केलात, तर आम्ही विद्यापीठात एकत्र येऊन निषेध करू, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थी संघटनांनी दिली.>घाटकोपरमध्ये विद्यार्थी झाले शिक्षकमुंबई : संपात शिक्षकांच्या काही संघटना देखील सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी शाळा देखील बंद होत्या. घाटकोपर पूर्वच्या पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेची मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलच्या शिक्षक या संपात सहभाग झाले पण या शाळेच्या विद्यार्थ्यांनीच शाळा चालविण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापकांची दूरध्वनीवरुन परवानगी घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेचे नियमित वर्ग वेळापत्रकाप्रमाणे चालविले. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी विषयाच्या तासिकेप्रमाणे विषय व वर्ग वाटून घेऊन उपस्थित विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करुन नियमित शाळा सुरु ठेवली. यात गौरी जाधव या दहावीच्या विद्यार्थीनीने मुख्याद्यापकाची तर अथर्व शेळके या विद्यार्थ्याने उपमुख्याध्यापक म्हणून भूमिका निभावली. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या २८ वर्गातील सर्व तासिका नियमितपणे पार पाडून त्यात ३६ विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली.
शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:32 AM