Join us

नेस्को लसीकरण केंद्रात मंडपाच्या कामाला अखेर झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:06 AM

लोकमत इफेक्ट; उन्हात उभ्या राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासामनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेस्को लसीकरण केंद्रात मंडपाच्या ...

लोकमत इफेक्ट; उन्हात उभ्या राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नेस्को लसीकरण केंद्रात मंडपाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ने येथे लसीकरणासाठी गेले काही दिवस लांबच लांब रांगा लागत असल्याचे तसेच त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्यांची गैरसाेय हाेत असल्याचे वृत्त सातत्याने दिले होते. येथे असलेला मंडप कमी पडत असून मोठा मंडप बांधण्याची विनंती गुरुवारी शिवसेना शाखा क्रमांक ५४ चे शाखाप्रमुख अजित भोगले यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना केली होती. अखेर शुक्रवारी येथे पार्किंगच्या जागेत सुमारे २००० नागरिकांसाठी मोठा मंडप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते त्वरित पूर्ण होणार असल्याची माहिती भोगले यांनी ‘लोकमत’ला दिली.

या कामाची पाहणी शुक्रवारी दुपारी शाखाप्रमुख अजित भोगले, वनराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश निवतकर, उपनिरीक्षक आवटी तसेच प्रसाद कदम, सचिन बागवे, स्वप्निल वाघधरे यांनी केली. गेले काही दिवस नेस्को लसीकरण केंद्राच्या बाहेर हब मॉलपर्यंत पहाटेपासून नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरुवारी सकाळी १० वाजता येथे ४५०० लसींचा साठा आला आणि सकाळी गेट उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकसुद्धा रांग लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत चक्क धावत सुटले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी दुपारी येथे भेट दिली आणि अडचणी समजावून घेतल्या होत्या.

नेस्को कोविड सेंटर येथे लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष भर उन्हात रांगेत उभे असतात. त्यामुळे चक्कर येणे, ब्लड प्रेशर वाढून नागरिकांना त्रास हाेणे अशा घटना घडतात. थोड्याच दिवसांत पाऊसदेखील पडेल, तेव्हाही नागरिकांना लसीकरणासाठी पावसात उभे राहावे लागेल. यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी अजून मोठा मंडप बांधावा व बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी शाखाप्रमुख अजित भोगले यांनी आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व स्थानिक नगरसेविका व महिला विभाग संघटक साधना माने यांना केली होती.

महापौर किशोरी पेडणेकर व अन्य मान्यवर नेत्यांनी नेस्को कोविड प्रशासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव मांडला. त्यानुसार त्वरित मंडप बांधण्यास शुक्रवारी अखेर सुरुवात झाली आहे. आपल्या पाठपुराव्याने उन्हात उभ्या राहणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ‘लोकमत’नेही गर्दीचे वृत्त देऊन येथील समस्येला वाचा फोडल्याबद्दल अजित भोगले व समाजसेवक गणेश हिरवे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

-------------------------------------