सीएसटी स्थानकात दोन महिने काम
By admin | Published: September 26, 2015 03:15 AM2015-09-26T03:15:24+5:302015-09-26T03:15:24+5:30
हार्बरवरील स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचा बारा डबासाठी विस्तार केला जात आहे. यात सर्वात मोठे काम हे सीएसटी स्थानकातील असून
मुंबई : हार्बरवरील स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचा बारा डबासाठी विस्तार केला जात आहे. यात सर्वात मोठे काम हे सीएसटी स्थानकातील असून ते दोन महिने चालणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. यातील तीन ते चार दिवस मोठा ब्लॉक घेवून काम केले जाईल. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मध्य रेल्वेची मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर याआधी नऊ डबा लोकल धावत होत्या. त्यानंतर बारा डबा लोकल धावत असून प्रत्येकी दोन पंधरा डबा लोकलचाही समावेश करण्यात आला आहे. अजूनही नऊ डबा असणाऱ्या हार्बर मार्गावर बारा डबा लोकल धावत नसून त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) बारा डबा लोकल मार्च २0१६ नंतर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एक वर्षापूर्वी हार्बर स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाची कामे हाती घेण्यात आली. यात बहुतांश कामे झाल्याचा दावा केला जात असून वडाळा स्थानकातील काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. सर्व स्थानकांतील बारा डबा लोकल चालवण्यासाठी कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर सर्वात कठीण काम असलेल्या सीएसटी स्थानकाकडे एमआरव्हीसीकडून लक्ष दिले जाणार असल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. सीएसटी स्थानकातील काम हे साधारपणे दोन महिने चालणार असल्याचे ते म्हणाले. तर यात मोठ्या कामासाठी तीन ते चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेवून काम केले जाणार असल्याने लोकल सेवेवर थोडा परिणाम होईल, अशी माहीती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)