मिठी नदीमधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:06 AM2021-05-06T04:06:56+5:302021-05-06T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर लगतच्या मिठी नदीवर पसरलेली जलपर्णी काढण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर लगतच्या मिठी नदीवर पसरलेली जलपर्णी काढण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी नदीतील जलपर्णी काढण्यासह अधिकाधिक गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पावसाळ्यात मिठी नदीला पूर येऊन पुराचे पाणी क्रांतीनगरसह लगतच्या वस्तीमधील घरांत शिरू नये म्हणून या कामास प्राधान्य देण्यात आले आहे.
२६ जुलैच्या पुरानंतर मिठी नदीलगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी मिठीचा धसका घेतला आहे. थोडा पाऊस पडला तरी मिठीला पूर येतो आणि नदीलगतच्या वस्त्यांमधील घरांत पाणी शिरते. परिणामी नागरिकांचे मोठे नुकसान होते. दरवर्षी पावसाळ्यात या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषत: कुर्लाच्या पश्चिमेकडील क्रांतीनगरमधील रहिवाशांना दर पावसाळा मिठीच्या पाण्यात काढावा लागतो. परिणामी येत्या पावसाळ्यात मिठीलगत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून उन्हाळ्यातच काम हाती घेण्यात आले आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुर्ला येथील नगरसेवक संजय तुर्डे यांनी सांगितले.
जलपर्णी असो किंवा मिठी नदीमधील कचरा, गाळ असाे, नदी स्वच्छ करण्यावर आमचा भर आहे. मिठी नदीकाठी वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या पाण्याला, दुर्गंधीला सामोरे जावे लागू नये. कोरोनाकाळात येथील परिसर स्वच्छ असावा, रोगराई पसरू नये. नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून या कामास प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांब पसरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागात असलेल्या मिठीच्या स्वच्छतेवर, संवर्धनावर मी भर देत आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांनीही महापालिकेला सहकार्य केले पाहिजे. मिठीमध्ये बांधकामाची भरणी, कचरा टाकता कामा नये. कोरोनाकाळात आपण एकमेकांसह महापालिकेलाही साथ दिली पाहिजे. मुंबई महापालिका कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत आहे. आपण महापालिकेला मदत केली, मिठी नदीसह परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला तर निश्चित समस्यांवर आपल्या स्तरावर तोडगा काढू शकतो, असेही तुर्डे यांनी नमूद केले.
...........................