मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरलगतच्या मिठी नदीवर पसरलेली जलपर्णी काढण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी नदीतील जलपर्णी काढण्यासह येथील अधिकाधिक गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पावसाळ्यात मिठी नदीला पूर येऊन पुराचे पाणी क्रांतीनगरसह लगतच्या वस्तींमधील घरांत शिरू नये म्हणून नदीतील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे.
२६ जुलै २००५च्या पुरानंतर मिठी नदीलगत राहणाऱ्या नागरिकांनी मिठीचा धसका घेतला आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी मिठीला पूर येतो आणि लगतच्या वस्तींमधील घरांत पाणी शिरते. परिणामी, नागरिकांचे मोठे नुकसान होते. विशेषत: कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमधील रहिवाशांना दर पावसाळा मिठीच्या पाण्यात काढावा लागतो. येत्या पावसात मिठीलगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून उन्हाळ्यातच हे काम हाती घेण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुर्ला येथील नगरसेवक संजय तुर्डे यांनी सांगितले.
जलपर्णी असो, मिठी नदीमधील कचरा किंवा गाळ. नदी स्वच्छ करण्यावर आमचा भर आहे. मिठी नदीकाठी वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना दुर्गंधीला, पावसाळ्यात पुराच्या पाण्याला सामोरे जावे लागू नये, कोरोना काळात येथील परिसर स्वच्छ असावा, रोगराई पसरू नये, नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून या कामास प्राधान्य देण्यात आल्याचे तुर्डे यांनी सांगितले. मिठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांब पसरली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागात असलेल्या मिठीच्या स्वच्छतेवर, संवर्धनावर भर देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनीही पालिकेला सहकार्य केले पाहिजे. मिठीमध्ये बांधकामाची भरणी, कचरा टाकता कामा नये. कोरोना काळात आपण एकमेकांना मदत करीत महापालिकेला साथ दिली पाहिजे. मुंबई महापालिका कोरोनावर नियंत्रणासाठी काम करीत आहे. आपण महापालिकेला मदत केली पाहिजे. मिठी नदी स्वच्छ ठेवण्याच्या कामात हातभार लावला पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला तर निश्चितच आपण सर्व समस्यांवर आपल्या स्तरावर तोडगा काढू शकतो, असेही तुर्डे यांनी नमूद केले.
...................................