के पश्चिम प्रभाग समितीचे कामकाज लोकाभिमुख करणार - योगीराज दाभाडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:42 PM2018-04-17T12:42:57+5:302018-04-17T12:42:57+5:30
महानगरपालिका वैधानिक समिती के-पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे
मनोहर कुंभेजकर
मुंबई - महानगरपालिका वैधानिक समिती के-पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी ठोस पावले उचलणार असून के-पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत महापालिका प्रशासनातील सर्व खाती, मध्यवर्ती यंत्रणा तसेच संबंधित प्राधिकरणातील वरिष्ठ अधिका-यांनी उपस्थित रहा हा महत्वपूर्ण आदेश त्यांनी प्रशासनास दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आपली प्रभागसमिती अध्यक्ष म्हणून भूमिका लोकमतशी बोलतांना स्पष्ठ केली.
योगीराज दाभाडकर यांनी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाची सूत्रे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ' स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत के-पश्चिम विभाग स्वच्छ व सुंदर राखण्याच्या दृष्टीने आणि हागणदारी व कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने नाल्यांचे रूपांतर नद्यांमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. नुकताच त्यांनी
गटारातील पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करून दाखवण्याचा प्रयोग त्यांच्या दालनामध्ये यशस्वीरित्या केला होता. त्यांच्या प्रयोगाची दखल मुंबई महानगरपालिकेतील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई मलनिःस्सार प्रकल्प, जलविभाग विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली होती. ऑर्गेनिक प्रक्रिया करून १५ ते २० मिनिटांत गटारातील पाणी स्वच्छ करून हे पाणी पुन्हा गार्डनिंग, टॉयलेट फ्लश अशा कामासाठी वापरता येईल आणि पाण्याची नासाडी कमी होईल असा विश्वास त्यांनी प्रयोगाअंती व्यक्त केला होता.
ते पुढे म्हणाले, " मी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. पाणी, मलनि: स्सारण वाहिन्या, फेरीवाले हटवून रस्ते मोकळे करणे, अनधिकृत बांधकामे थांबवून विविध सोसायट्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार जास्तीत- जास्त लोकाभिमुख व्हावा तसेच विभागातील नागरिकांच्या नागरी समस्यांचे निराकरण विभाग स्तरावर व्हावे यासाठी प्रत्येक महिन्यात भरणा-या के-पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत महापालिका प्रशासनातील विभाग स्तरावरील सर्व खात्यातील, मध्यवर्ती यंत्रणेतील तसेच संबंधित प्राधिकरणातील वरिष्ठ अधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले आहेत. जेणेकरून लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रभागातील उपस्थित केलेल्या नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण होऊ शकेल."
ते पुढे म्हणाले, के -पश्चिम विभागातील रस्त्यांवरील फेरीवाले, विशेषतः शिजवलेल्या अन्नपदार्थांची विक्री करणा-या फेरीवाल्यांवर प्रशासनाकडून सातत्याने कठोर व कायमस्वरूपी कारवाई करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात यावी व याबद्दलची कारवाई प्रशासनाकडून वारंवार व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा उचित आणि वेळीच उपयोग करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी प्रशासनास केली.
पश्चिम प्रभाग समितीच्या के पश्चिम विभागाची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द् फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार अँड. आशिष शेलार, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष व आमदार अमित साटम, वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे आभार मानले. तसेच मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप- महापौर हेमांगी वरळीकर, भारतीय जनता पक्षाचे मान्यवर नेते व पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांचे आभार मानले.