मुंबई : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. खाजगी कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने लाखो लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यामुळे स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात रोजगार मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई आणि उपनगर जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५८ हजार ६०० जणांनी नोकरीसाठी अर्ज केला आहे.
मुंबई ही मायानगरी आहे. असंख्य स्वप्ने उराशी बाळगून दररोज येथे हजारो तरुण दाखल होत असतात. उत्पादन, सेवा क्षेत्र, बांधकाम, आयटी, हॉटेल यासह असंख्य क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याने रोजगाराच्या दृष्टीने ते मुंबईकडे आशेने पाहतात. मात्र, कोरोनाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने पुढाकार घेतला आहे.
केंद्राकडे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रोजगाराची संधी असल्यास कळविण्यात येते. शिवाय रोजगार मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत जवळपास ३८ हजार ३०० जणांना रोजगार मिळाला आहे.
.......
कोणत्या वर्षात किती नोंदणी
२०१९ - ६५,०६८
२०२० - ५८,५५०
२०२१ (ऑगस्टपर्यंत) - ५८,६००
..........
किती जणांना लागली नोकरी?
२०१९ - ३९,१३२
२०२० - ३८,२०४
२०२१ (ऑगस्टपर्यंत) - ३८,३००
.........
आतापर्यंत किती जणांना रोजगार मिळाला?
स्त्री - ९६,८५५
पुरुष - २,७४,०९९
.........
आठ महिन्यांत ३८ हजार जणांना लागली नोकरी
कोरोना काळात स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली असून, गेल्या आठ महिन्यांत ५८ हजार ६०० अर्ज दाखल झाले. त्यापैकी ३८ हजार ३०० जणांना नोकरी लागली. २०१९ मध्ये ३९ हजार १३२, तर २०२० मध्ये ३८ हजार २०४ जणांना रोजगार मिळाला.