सायक्लोथॉनमध्ये झुंबा वर्कआउटची धम्माल
By admin | Published: October 10, 2016 03:56 AM2016-10-10T03:56:28+5:302016-10-10T03:56:28+5:30
सायक्लोथॉन आणि झुंबा वर्कआउट करण्यासाठी आयआयटीएन्ससोबत नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आरोग्यदायी रविवार
मुंबई : वेळ सकाळी ७ची... सायकल घेऊन सज्ज झालेले नागरिक आणि काहीतरी नवे करण्याच्या नागरिकांच्या उत्साहाने आयआयटी कॅम्पस बहरून गेला होता. सायक्लोथॉन आणि झुंबा वर्कआउट करण्यासाठी आयआयटीएन्ससोबत नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आरोग्यदायी रविवार साजरा केला.
मोबाइल फोन्स, टॅब आणि फास्ट फूडच्या आहारी हल्ली सारेच जण गेले आहेत. याचे दुष्परिणाम म्हणून मधुमेह, लठ्ठपणा वाढत आहे. याविषयी नागरिकांना जागृत करण्यासाठी आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट अंतर्गत रविवारी ‘सायक्लोथॉन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी ७ वाजता विविध वयोगटातील तब्बल १ हजार ६००हून अधिक नागरिक उपस्थित होते. या सायक्लोथॉनचा फ्लॅग आॅफ रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा पूर्ण करणारे सायकलिस्ट महेंद्र महाजन यांनी केल्यानंतर सायकलस्वारांनी कॅम्पस परिसरात १५ किमी अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे यात शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
सायकलिंगनंतर नृत्यासोबत व्यायामाचा आनंद देणारा झुंबा वर्कआउट करण्यात आला. अगदी सोप्या पद्धतीने वजन कमी करण्याची पद्धत म्हणून झुंबा वर्कआउट ओळखला जातो. संगीताच्या तालावर घेतलेल्या या झुंबाचा आनंद उपस्थितांनी लुटला. तर त्यानंतर विद्यार्थ्यांच्या समूहाने बीएमएक्स स्टंट शो सादरीकरण करीत उपस्थितांना थक्क केले. आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘क्युरेड’ या विशेष उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉनचे उपस्थितांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)