Join us  

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सहा महिन्यात सुरु करण्याचे आश्वासन 

By मनोहर कुंभेजकर | Published: January 20, 2023 8:24 PM

अंधेरी पूर्व एमआय डीसी येथील कामगार हॉस्पिटलला दि,१७ डिसेंबर २०१८ साली लागलेल्या आगीनंतर सदर हॉस्पिटल बंद आहे.

मुंबई-

अंधेरी पूर्व एमआय डीसी येथील कामगार हॉस्पिटलला दि,१७ डिसेंबर २०१८ साली लागलेल्या आगीनंतर सदर हॉस्पिटल बंद आहे. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने. अंधेरीतील हे ह़ॉस्पिटल लवकर सुरु करावे अशी कामगारांची मागणी आहे. 

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल प्रश्नी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी आवाज उठवला होता. हे हॉस्पिटल उद्योगपतीच्या घशात घालू नका व एका महिन्यात हॉस्पिटल सुरु करा अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तात्काळ दखल घेऊन एका बैठकीचे आयोजन केले होते. 

परंतू या रुग्णालायाचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यात ओपीडी विभाग सुरु करु व सहा महिन्यात पूर्ण हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.लोकमतने देखिल सातत्याने हा विषय मांडला आहे.

यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार बैठक घेतली. या बैठकीत ईएसआयसीचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी,तसेच राजेश शर्मा व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते. 

काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरु होण्यास विलंब होत आहे, परंतु यातून लवकरच मार्ग काढून पुढील तीन महिन्यात ओपीडी विभाग सुरु करु व सहा महिन्यात हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुरु केल्या जातील असे आश्वासन या बैठकीत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेडस व मेडीकल कॉलेज होते. या रुग्णलयात ओपीडी,आयपीडी( ३५०बेड्स),आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. ओपिडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.