कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:37 PM2020-05-23T12:37:26+5:302020-05-23T12:38:47+5:30
प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते, तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होते.
मुंबई - कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांनी बोरिवली येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दुपारी बोरिवली (पूर्व), दौलतनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दादा सामंत हे पत्नीसह बोरिवलीत ज्येष्ठ कन्या गीता प्रभू यांच्या निवासस्थानी राहत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हे पाऊल का उचलले,अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते, तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होते. दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांच्या १६ जानेवारी १९९७ साली झालेल्या निर्घृण हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत ते कामगार आघाडी व संलग्न युनियनचे अध्यक्ष होते. १९८१च्या गिरणी संपानंतर ग्वाल्हेर येथील गिरणीमधील नोकरी सोडत ते दत्ता सामंत यांच्यासोबत युनियनमध्ये सक्रिय झाले. कामगार कायद्यांवर त्यांचा चांगला अभ्यास होता.