मनोहर कुंभेजकर, मुंबई : गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात दोन दिवसीय कामगार,सुरक्षा अधिकारी,कारखाना व्यवस्थापन आणि सुरक्षा क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांमध्ये सुरक्षिततेचे महत्व वृद्धिंगत करण्यासाठी सुरक्षा साधनांचे प्रदर्शन आणि औद्योगीक सुरक्षा परिषद अंतर्गत वर्ल्ड ऑफ सेफ्टी, समिट आणि एक्स्पो 2024 "या उपक्रमाचे आयोजन औद्योगीक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) व सेफ्टी अप्लायन्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सामा) यांच्या सहकार्याने केले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनात राज्यातील विविध कारखान्यातील 1200 कंपनी प्रतिनधिनीनी भाग घेतला आहे.आधुनिक सुरक्षा विषयक साधनांचे विषद करणारे हे दोन दिवसीय प्रदर्शन खरोखरीच बघण्यासारखे आहे.
या प्रदर्शनात विविध सुरक्षा विषयक साधनांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानसह प्रदर्शन आणि सुरक्षा व्यावसायिकांशी आणि तज्ञासोबत विविध चर्चासत्र आयोजीत केले आहे.
या सोहळ्याला औद्योगीक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे (डिश) संचालक देविदास गोरे,महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष संजय क्षीरसागर,सेफ्टी अप्लायन्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सामा)चे अध्यक्षहेमंत सप्रा,डिशचे सहसंचालक सुरेश जोशी,डिशचे सहसंचालक राम दहीफळे ,सामाचे कार्यकारी संचालक विरेंद्र जौहरी,सामाच्या उपाध्यक्ष श्रीमती वेंडी लेस्ली,सामाचे सदस्य दिपेश शहा,व्हीनस सेफ्टीचे कार्यकारी संचालक महेश कुडव,तसेच महाराष्ट्रातील कारखान्यांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डिशचे संचालक देविदास गोरे आपल्या भाषणात म्हणाले की, भारतातील महाराष्ट्र राज्य हे मजबूत औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते.औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादनासाठी महाराष्ट्र हे एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.कारखाना अधिनियम 1948च्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात सुमारे 37500 कारखाने असून 35 लाख कामगार काम करतात. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.कारखान्यांमधील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी डिशचे योगदान महत्वाचे आहे.कारखान्यातील अपघात हे प्रामुख्याने मानवी चुकांमुळे आणि निष्काळजीपणामुळे होतात,त्यावेळी दुःख होते.त्यामुळे काम करतांना कामगारांनी सुरक्षित साधनांचा उपयोग करून आपल्या कारखान्यात शून्य अपघात कसे होतील यासाठी कामगारांनी सातत्याने प्रयत्नशील राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन देविदास गोरे यांनी केले.
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष संजय क्षीरसागर आपल्या भाषणात म्हणाले की,जगात दरवर्षी 2.5 कोटी कामगार अपघातात मृत्युमुखी होतात, तर 300 कोटी कामगार अपघातात जखमी होतात.भारतात रोज 3 ते 4 कामगारांचा अपघातात मृत्यू होतो.सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने आणि कामात शॉर्टकट मारल्याने सुमारे 80 ते 90 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान होते.त्यामुळे केवळ कारखान्यात काम करतांना तसेच सगळीकडे आपण शिस्त पाळून सुरक्षितेची अंमलबजावणी केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात औद्योगीक क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ भागधारक, कारखाना निरीक्षक, उद्योगामधील आरोग्य-पर्यावरण-सुरक्षा विषयक काम पाहणारे अधिकारी , आपत्कालीन व्यवस्था क्षेत्रामधील अधिकारी इत्यादी सोबतच उद्योगामधील सुरक्षेशी निगडीत सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. सदरचे प्रदर्शन निशुल्क आहे. या प्रदर्शना मध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन देविदास गोरे यांनी केले आहे.