मुंबई: मालकाचे पैसे चोरून कामगाराने गावातील कर्ज फेडण्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. मालकाची दिशाभूल करत चौघांनी लुबाडल्याचा बनावही त्याने केला. मात्र, यात त्याचाच सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी नितेशकुमार सिंग याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.
तक्रारदार मोहीदूर रेहमान (३८) यांचा पार्टनरशिपमध्ये कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांनी सिंगला महिनाभरापूर्वी कामावर ठेवले होते. रहमान यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पार्टनर बाहेरगावी असल्यामुळे त्याने सिंगला फोन करत वडाळामधील दोन ग्राहकांकडून एकूण ९ लाख ५० हजार रुपये आणायला सांगितले होते. ते पैसे त्यांनी आणले का याची चौकशी पार्टनरने रेहमानकडे केली. सिंगचा मोबाइल बंद येत होता.
सीसीटीव्हीत उघड-
१) रेहमान सिंगच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घरालाही कुलूप होते. दुपारी सिंगने रेहमान यांच्या भागीदाराला फोन करून कळवले की त्याच्याजवळ असलेली पैशाची बॅग चार अनोळखी इसमांनी हिसकावून घेतली. तो अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात आला आहे.
२) रेहमान रेल्वे पोलिस ठाण्याजवळ आल्यावर त्यांनी हा प्रकार वांद्रा रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळले, ज्यात तसा काही प्रकार घडलाच नसल्याचे उघड झाले.
३) पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सिंगची सखोल चौकशी केली आणि त्याने जोगेश्वरीमधील मनी ट्रान्सफरच्या ऑफिसमधून त्याच्या राहत्या गावी सहा विविध कर्जदार लोकांच्या खात्यावर पैसे पाठवल्याचे कबूल केले.