Join us

कामगारांना लॉकडाऊनची, तर उद्योजकांना कामगार परत जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने कठाेर निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे कामगार गावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने कठाेर निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे कामगार गावी परतण्याचे नियोजन करीत आहेत. तर कामगार गावी गेल्यास व्यवसायाचे कसे होणार, याची धास्ती उद्योजकांना आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाले ते सलग जून महिन्यापर्यंत सुरू होते. जून महिन्यात काही उद्योग सुरू राहिले. मात्र, हाॅटेल, बांधकामे ठप्पच राहिली. हातचे काम गेल्याने उपासमार होऊ नये, यासाठी राज्याबाहेरील कामगार आपल्या गावी परतले. त्यामुळे उद्योगांना मोठा फटका बसला. तर हाॅटेल, बांधकाम व्यावसायिकांचा सुमारे दहा महिने व्यवसाय बंद होऊनही त्यांची सोय करावी लागली. त्यामुळे या सर्व उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला तर कामगारांचीही उपासमार झाली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासनसुद्धा चिंतित आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंधांशिवाय पर्याय नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त आलेले कामगार गावाकडे परत जात आहेत. बांधकाम क्षेत्र, उद्योग क्षेत्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांत राज्याबाहेरील कामगारांची संख्या मोठी आहे. आता हे सर्व गावी परत जाण्याचा बेत आखत असल्याचे कामगारांनी सांगितले. तर कामगार परत गेल्यास व्यवसाय, उद्योगावर परिणाम होईल, याची भीती व्यावसायिकांना आहे.

* हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

गेल्या वर्षी लाॅकडाऊन १५ दिवसांसाठी करण्यात आले होते. मात्र, ते वाढत गेले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत उद्योग सुरू झाले नव्हते. काही कामगारांच्या हातचे कामही गेले होते. आता कडक निर्बंधांनंतर लाॅकडाऊन झाले तर पुन्हा उपासमार होण्याची भीती वाटते. काम नसेल तर खाणार काय?

- अंकित मिश्रा, कामगार

लॉकडाऊन लागले तर व्यवसाय ठप्प पडतील. त्यामुळे हाताला काम उरणार नाही. हाताला कामच नसेल तर इथे थांबून उपयोग काय? त्यामुळे लॉकडाऊन लागले तर गावाकडे परत जाणार आहे.

- संतोषकुमार वर्मा, कामगार

लॉकडाऊन लागल्यास सर्व व्यवसाय बंद ठेवले जातात. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. लॉकडाऊन लागल्यास इथे थांबण्यापेक्षा गावाकडे परत जाण्याचा बेत आखला आहे.

- रामनारायण गुप्ता, कामगार

* माेठा फटका बसणार

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार गावी गेले होते. त्यानंतर ३० टक्के रेस्टॉरंट बंद झाले. अनलॉक केल्यानंतर केवळ ६० टक्के कामगार आले, पण कोरोनामुळे ५० टक्के उपस्थिती असल्याने कमतरता भासली नाही. आता पार्सल सेवा केवळ २० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असून इतर कर्मचारी गावी गेले आहेत, काही जाणार आहेत. हे कर्मचारी पुन्हा येण्याची शक्यता कमी असून त्याचा मोठा फटका बसणार आहे.

- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार

* उत्तर प्रदेश, बिहारचे कागार जास्त

कामगार गावी परत जात असल्याने त्याचा उद्योगावर मोठा परिणाम होईल. केमिकल, वेअर हाउसिंग, बांधकाम, प्लास्टिक आदी क्षेत्रांत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील कामगारांचा समावेश आहे. ते कामगार गेल्यामुळे या क्षेत्रांना मोठा फटका बसेल.

- चंद्रकांत साळुंखे,

संस्थापक आणि अध्यक्ष एसएमई चेंबर ऑफ इंडिया