मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याबाहेरील कर्मचारी परत गेले होते. मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे, त्यामुळे हळूहळू कामगार परत येण्यास सुरुवात झाली आहे.
ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी ठिकाणांवरून कामगार राज्यात येतात. कोरोनामुळे राज्यातील कामगार आपल्या राज्यात परत गेले होते. तसेच काही राज्यांतील निवडणुकांसाठी कामगार गेले होते; त्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ते कामगार आता परत येत आहेत. तसेच काम नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईतील कोरोना कमी झाल्याने कामगार पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत.
याबाबत डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले की, राज्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे कामगार आपल्या राज्यात परत गेले होते ; मात्र आता त्यांच्या राज्यातही कोरोना वाढत आहे, पण मुंबईत कोरोना रुग्ण कमी होत आहेत. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई आणि पुणे येथे आरोग्य सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे कामगार परत येत आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर दररोज १८ गाड्या परत येत आहेत. पण प्रवासी संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.
कोरोना तपासणी यादीत उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश नव्हता पण आता करण्यात आला आहे. या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे त्यामुळे प्रवाशांच्या रांगा लागत आहेत.
वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे