शताब्दीच्या कामगारांना तीन महिने पगार नाही
By admin | Published: December 24, 2016 03:43 AM2016-12-24T03:43:21+5:302016-12-24T03:43:21+5:30
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना १२ ते १६ तासांहून अधिक वेळ काम करूनदेखील गेल्या तीन महिन्यांपासून
मुंबई : कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना १२ ते १६ तासांहून अधिक वेळ काम करूनदेखील गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. रुग्णालयात सुमारे १७१ कामगार कंत्राटी आहेत. त्यांना १२ संस्थांनी नेमले आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या कामगारांना पगार मिळालेला नाही. यातील एका कामगाराने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांचा पगार अडविल्यानंतर आम्ही याबाबत संबंधितांना विचारले. तेव्हा चार दिवसांत पगार करतो, आठ दिवसांत देतो, अशी उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिसरा महिना उजाडला तरी एकही पैसा देण्यात आला नाही. त्यात नोटाबंदीचा निर्णय झाल्याने आणखी हाल झाले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून आम्ही काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, आंदोलनामुळे रुग्णांना नाहक त्रास होत असल्याची जाणीव आम्हाला असून, आमच्यावरही अन्याय होता कामा नये, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)