मुंबई : घाटकोपर येथील सूर्यनगरमधील पारसीवाडी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते दत्ताराम सकपाळ यांना अनंत चतुर्दशीच्या पहाटे चक्कर आल्यामुळे त्यांना जवळच असलेल्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सकपाळ यांच्यावर तत्काळ उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे मंडळाचे म्हणणे आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.अनंत चतुर्दशीच्या पहाटे ५च्या सुमारास सकपाळ हे मंडपामध्ये उभे होते. तेव्हा त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. यानंतर तत्काळ त्यांना राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना अपघात विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. या वेळी डॉ. प्रिया जाधव या आॅन ड्युटी होत्या. मात्र त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सकपाळ स्वत: माझ्या छातीत दुखत आहे, असे सांगत होते. मात्र अॅसिडिटीमुळे दुखत असणार, असे डॉक्टर सांगत होते. त्यांना सलाइन लावल्यावर उलटी झाली. त्यांना घेऊन बाह्यरुग्ण विभागामध्ये जा, असा सल्ला नातेवाइकांना देण्यात आला. यानंतर सकपाळ यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवा, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. मात्र सकाळी ८.३५ वाजता सकपाळ यांचा मृत्यू झाला. या संदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली. आठ दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल सादर झाल्यावर कोण दोषी होते हे कळेल आणि त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घाटकोपरमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू
By admin | Published: September 10, 2014 1:57 AM