लॉकडाऊनच्या धास्तीने मजुरांचे ‘गाँव चले हम’; मुंबईत आजाराची चिंता, गाड्यांची गर्दी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:28 AM2022-01-10T07:28:20+5:302022-01-10T07:36:56+5:30
मुंबईत आजाराची चिंता; गाड्यांची गर्दी वाढली
- नितीन जगताप
मुंबई : राज्यात झपाट्याने वाढणारे कोरोना, ओमायक्रॉनचे रुग्ण आणि निर्बंध कठोर केल्यावर भीतीने महामुंबई परिसरातील अनेक मजुरांनी पुन्हा गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशात जाणाऱ्या गाड्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
काेराेनाच्या संसर्गामुळे लागू केलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये मजूर-कामगारांचे प्रचंड हाल झाले. हाती काम नसल्याने उपासमार झाली. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने अनेकांनी आठवडाभर पायी चालत गाव गाठले. अवैध वाहनांमधून प्रवास करताना झालेल्या अपघातांत अनेक मजुरांनी जीव गमावला. दुसऱ्या लॉकडाऊनवेळीही अशीच गर्दी पाहायला मिळाली. सध्या लॉकडाऊन नसले तरी कोरोनाची लागण होण्याची धास्ती कायम आहे.
काेराेना रुग्णांची संख्या महिनाभरात झपाट्याने वाढली, तर लॉकडाऊन लागेल अशी भीती कामगारांच्या कुटुंबात आहे. त्यातच हॉटेल, मॉल, दुकाने येथे निम्म्या संख्येने आणि दोन्ही डोस घेतलेल्या कामगारांची सक्ती झाल्याने या क्षेत्रासह छाेट्या कंपन्यांतील कामगार, छोटे व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार हवालदिल आहेत.
आधीच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. आता परत तेच दिवस पुन्हा नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टिळक टर्मिनस, कल्याण, पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. टिळक टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या सुटतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासाठी धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.