मुंबई : कामगारांनी प्रदीर्घ संघर्ष करून इंग्रज आणि नंतर संविधानामध्ये हक्क मिळविले आहेत; परंतु या हक्कांवर नवे सरकार गदा आणत असून आपल्या हक्कांसाठी कामगारांनी लढा उभारण्याची गरजआहे, असे मत गुरुवारी आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या राष्ट्रीय सरचिटणीस अमरजित कौर यांनी व्यक्त केले. त्या आयटकच्या शतक महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या.
आयटकच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दादरच्या कोतवाल उद्यानापासून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरपर्यंत दुपारी शेकडो कामगारांनी रॅली काढली. त्यानंतर रवींद्र नाट्यमंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव रेड्डी, ज्येष्ठ कामगार नेते र. गो. कर्णिक, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते एम. ए. पाटील व दिलीप उटाणे, आयटकचे राज्य अध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस श्याम काळे, राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धु, सिटू संघटनेचे सरचिटणीस तपन सेन आदी उपस्थित होते. कौर म्हणाल्या, कामगार चळवळीचे अस्तित्व नवीन सरकार नष्ट करू पाहत आहे. त्यामुळे हे अधिकार व हक्क जैसे थे ठेवायचे असतील, तर पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करावे लागेल, असे त्या म्हणाल्या. कामगार संघटनांनी यासाठी एकत्रित येत लढा तीव्र करण्याचे आवाहन कौर यांनी केले. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव रेड्डी म्हणाले, ब्रिटिशांनी देशातील संपत्ती बाहेर नेली; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ठरावीक धनदांडग्यांकडे संपत्ती वळवत आहे. त्यासाठी गरीब कामगारांचे हक्क व अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भविष्यात कामगार अधिक गरीब, तर भांडवलदार अधिक श्रीमंत होणार आहे. म्हणूनच सार्वजनिक क्षेत्रासह संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार व संघटनांनी एकत्रित येण्याचे आवाहन रेड्डी यांनी या वेळी केले.