मुंबई - जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत उद्या मुंबईत श्रमिक जनतेची जाहीरनामा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील शिवाजी मंदीर येथे दुपारी 3 ते 6 मध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेच्या हक्काचे आंदोलन हे विविध गट, समूह, संघटना एकत्रित आंदोलन असून लोकांच्या सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. हा जाहीरनामा सर्वासमोर मांडण्यासाठी “श्रमिक जनतेची जाहीरनामा परिषद” घेण्यात येत आहे. या परिषदेमध्ये जनतेच्या मागण्या सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोर मांडल्या जाणार आहेत व त्यांना याबद्दल मत मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
जगण्याच्या हक्काचे आंदोलन (जेएचए) हे कष्टकरी, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी अल्पसंख्य गट, आरोग्य, शेती, पाणी, आरोग्य, अन्नसुरक्षा, शिक्षण यासारख्या सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना-गट, पर्यावरण संस्था, विविध क्षेत्रातील तज्ञ यांचे एकत्रित राज्यव्यापी नेटवर्क आहे.
जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत गेल्या चार-पाच वर्षापासून राज्य सरकारच्या सामाजिक सेवांचे बजेट विश्लेषण केले जात आहे. राज्य सरकारच्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जनतेचा पैसा श्रीमंतांच्या घश्यात घालणाऱ्या धोरणांचा विरोध करत जनतेला मुलभूत सेवा सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने किती पैसे खर्च करणे आवश्यक आहेत, याचा लेखाजोखा जगण्याच्या हक्काचे आंदोलनने अनेकदा मांडला आहे.
निवडणुकीच्या काळात जनतेच्या मागण्यांबाबत वातावरण संवेदनशील असते, येत्या निवडणूकीला डोळ्यासमोर ठेऊन जगण्याच्या हक्काचे आंदोलनाने आपापसात चर्चा आणि मसलत करून जनतेच्या विविध क्षेत्रातील मागण्या एकत्रित केल्या आहेत. यामध्ये जनतेच्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी अनेक समस्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यात शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, पाणी, सिचन शेती, असंघटीत क्षेत्र, आदिवासी, दलित, स्त्रिया, अल्पसंख्याक अशा गटांच्या सामाजिक सुरक्षेच्या मागण्या या एकत्रित करण्यात आल्या आहेत. तसेच लोकशाही संवर्धन व सुधार, सध्याच्या सरकारच्या राजकीय भूमिकांमुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, स्त्रिया यांच्यावर होत असलेले अत्याचार आणि या विरोधात काय भूमिका घेतली गेली पाहिजे याची मांडणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रस्तावित मागण्या घेऊन विभागीय स्तरांवर कार्यकर्त्यांशी बैठका आयोजित करुन त्यातून हा जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप दिले आहे. हा जाहीरनामा “श्रमिक जनतेचा जाहीरनामा परिषद” घेऊन सर्वांसमोर प्रकाशित करण्यात येणार आहे. या परिषदेला सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना बोलावण्यात आले आहे, हे सर्व मुद्दे त्यांच्यासमोर मांडून त्यांनी जाहीरनाम्यातील या मागण्यांवर त्यांनी आपले मत नोंदवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, धनंजय शिंदे यांनी केले आहे.