Join us

कामगार आशेने परतले; पण पोटाला भाकर मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 3:39 PM

Mumbai Workers : मूळ गावी दाखल झालेले कामगार आता पुन्हा मुंबईत परतले आहेत.

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या मूळ गावी दाखल झालेले कामगार आता पुन्हा मुंबईत परतले आहेत. मात्र कोरोनामुळे मुंबईचा वेग देखील धीमाच असून, येथील उद्योगधंदे अद्यापही पुर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत. परिणामी आपल्या कुटूंबासह मुंबईत परलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. शिवाय काम नसल्याने पोटाला भाकरदेखील मिळत नसल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अनलॉकनंतर मुंबई शहर आणि उपनगर आता काहीसे वेगाने धावू लागले आहे. मात्र अद्यापही मुंबईने हवा तसा वेग पकडलेला नाही. याच काळात आपल्या मूळ गावी दाखल झालेले कामगार आता मुंबईत परतू लागले आहेत. कामगार क्षेत्रात काम करणारे बिलाल खान यांच्याकडील माहितीनुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सरकारने मुंबईसह राज्यातील बहुतांश कामगारांना आपल्या मुळ गावी जाण्यासाठी मदत केली. यात उत्तर भारतासह महाराष्ट्रातील कामगारांचादेखील समावेश होता. कोरोनापासून वाचण्यासाठी कामगार गावी दाखल झाले खरे; मात्र येथे देखील त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. कारण गावीदेखील कोरोनामुळे हाताला काम मिळेनासे झाले. यात सुरु झालेल्या मान्सूनमुळे खुप पाऊस पडला. पूर आला.

विशेषत: उत्तर भारतात दाखल झालेल्या कामगारांना या पावसाचा, पूराचा फटका बसला. म्हणजे कोरोनापासून वाचण्यासाठी गावी गेलेल्या कामगाराला पावसाने झोडपले. हे होते तोवर लॉकडाऊन शिथिल झाले आणि कामगार मुंबईत परतू लागला. मात्र येथे परतलेल्या कामगाराला हाताला काम मिळेनासे झाले. कारण सगळेच उद्योग धंदे सुरु झालेले नाहीत. त्यामुळे पुर्ण क्षमतेने मुंबई धावत नसल्याने आणि उद्योग पुर्ण क्षमतेने सुरु झाले नसल्याने कामगार आजही कामाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रोजगार नाही. पैसा नाही. परिणामी सोबत आलेल्या कुटूंबाचेदेखील हाल सुरु आहेत. विशेषत: राजस्थानातून पूर्व उपनगरातल्या ठक्कर बाप्पा कॉलनीत आशेने परतलेल्या पादत्राणे बनविणा-या कामगारांना पोटाला भाकर मिळत नसल्याचे चित्र आहे.   

 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र