कामगार मूळ गावी परतल्याने रेस्टॉरंटची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:53+5:302021-04-23T04:07:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेस्टॉरंटमध्ये काम करणारे ७० टक्के कर्मचारी हे परराज्यांतून आलेले असतात. पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर ...

As the workers returned to their hometowns, the restaurant's financial situation deteriorated | कामगार मूळ गावी परतल्याने रेस्टॉरंटची आर्थिक घडी विस्कटली

कामगार मूळ गावी परतल्याने रेस्टॉरंटची आर्थिक घडी विस्कटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेस्टॉरंटमध्ये काम करणारे ७० टक्के कर्मचारी हे परराज्यांतून आलेले असतात. पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्व काही बंद केल्याने हे कर्मचारी तीन ते चार महिने अडकून राहिले होते. यामुळे अनेक कामगारांचे हाल झाले. आता दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, त्यावेळी त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन होण्याआधीच ते तातडीने आपल्या राज्यात निघून गेले. रेस्टॉरंट व्यावसायिकांना कुठूनही मदतीचा हात मिळत नसल्याने त्यांना शून्यातून पुन्हा आपल्या पायावर उभे राहावे लागणार आहे, असे रेस्टॉरंट क्षेत्रात कार्यरत असलेले राज साडविलकर यांनी सांगितले. याच विषयावर त्यांच्याशी साधलेला संवाद.

१. मागील वर्षभरात रेस्टॉरंट क्षेत्राचे किती नुकसान झाले ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांत आधी आणि जास्त फटका हा हॉटेल इंडस्ट्रीला बसला. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यातही हॉटेल इंडस्ट्रीला सर्वांत शेवटी परवानगी देण्यात आली होती. सुरुवातीपासूनच रेस्टॉरंट बंद ठेवायला सांगितले असले तरी आमचे जागेचे भाडे देणे सुरू होते. वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचे पगारही सुरू होते. त्या बदल्यात आमची कमाई शून्य होती. त्यामुळे सर्व रेस्टॉरंट मालकांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले.

२. लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट्स कायमची बंद पडली आहेत का?

मुंबईत अनेक रेस्टॉरंट्सची जागा भाडेतत्त्वावर असल्याने अनेक मालकांना लॉकडाऊनच्या काळात भाडे देणे जमले नाही. त्याचप्रमाणे इतर अनेक गोष्टींचे कर्ज झाल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली. काही मोठ्या ब्रँडचे रेस्टॉरंट्स या काळात तरले, परंतु ज्यांनी नुकताच रेस्टॉरंट क्षेत्रात पाय ठेवला होता, अशांना नाइलाजास्तव आपले रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद करावे लागले. अनेक नावाजलेली रेस्टॉरंटही या काळात बंद झाली.

३. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट क्षेत्राला कशाप्रकारे फटका बसणार आहे ?

पहिल्या लॉकडाऊननंतर काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय हळूहळू रुळावर येत होता. परंतु आता कोरोनाचा कहर पुन्हा वाढल्याने शासनाला पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनसारखीच परिस्थिती यावेळीही रेस्टॉरंट मालकांवर ओढवली आहे. जागामालक यावेळी कोणत्याही प्रकारचे कारण ऐकून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनप्रमाणेच यावेळीही रेस्टॉरंट व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे.

४. रेस्टॉरंट व्यवसायाला उभारी घेण्यास किती वेळ लागेल ?

यावेळचा लॉकडाऊन संपण्यास अजून किती कालावधी जाईल, याबद्दल कोणालाच सांगता येणार नाही. परंतु या लॉकडाऊननंतर रेस्टॉरंट व्यवसायाला पुन्हा उभे राहण्यास अनेक अडचणी येणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी गावाला गेल्याने मनुष्यबळाचा तुटवडा भासणार आहे. त्याचप्रमाणे अनेक गोष्टींसाठी नव्याने कर्ज काढावे लागणार आहे. रेस्टॉरंट व्यावसायिकांना कुठूनही मदतीचा हात मिळत नसल्याने त्यांना शून्यातून पुन्हा आपल्या पायावर उभे राहावे लागणार आहे.

(मुलाखत : ओमकार गावंड)

...............................

Web Title: As the workers returned to their hometowns, the restaurant's financial situation deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.