मुंबई : संपामुळे एसटी कामगारांचे होणारे नुकसान हे कोणताही राजकीय पक्ष भरून देणार नाही. त्यामुळे कामगारांनी संप मागे घ्यावा व कृती समिती पदाधिकाऱ्यांनीही कामगारांना संप मागे घेण्याबाबत समजावून सांगावे, असे आवाहन परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळ प्रशासनाने निलंबनाची कारवाई हाती घेताच ही कारवाई मागे घेण्याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी अनिल परब यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी परब यांनी कृती समितीला आवाहन केले.
संपामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. राज्यात ५६ महामंडळे आहेत. उद्या ही महामंडळेही शासनात विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागेल. एखादे महामंडळ विलीनीकरण करायचे झाले त्याचा सारासार विचार करावा लागतो. ही वस्तुस्थिती कामगारांना समजावून सांगा आणि त्यांना पुन्हा कामावर रूजू होण्यास सांगावे, असे आवाहनही परब यांनी केले. दरम्यान, कुठल्याही कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आकसाने कारवाई केलेली नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
सदाभाऊ खोत यांनीही घेतली भेट
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनीही अनिल परब यांची भेट घेतली. कामगारांचे पगार खूपच कमी आहेत. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यामुळे महामंडळाचे विलीनीकरण करा, अशी मागणी खोत यांनी केली. त्यावेळी परब म्हणाले, विलीनीकरणाबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार प्रक्रिया होईल. सरकारने त्यासाठी समिती नेमली आहे.