मुंबई - कामगार विरोधी धोरण अवलंबत असल्याचा आरोप करत मुंबई महानगरपालिका आयुक्तांविरोधात महापालिकेतील सर्व मान्यता प्राप्त कामगार संघटना एकवटल्या आहेत. ५ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून सर्व कामगार आपला रोष व्यक्त करणार आहेत. ४० मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्रित येत तयार केलेल्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी कामगार नेते महाबळ शेट्टी म्हणाले की, महापालिकेतील कायम कर्मचारी कमी करून कंत्राटी आणि ठेकेदारी पद्धतीने कामे करून घेतल्याचा देखावा केला जात आहे. बायोमेट्रीक यंत्रात बिघाड असून त्यामुळे प्रशासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा केल्याचा आरोपही त्यांनी केला. कामाच्या वेळा, कामाचे तास, किमान वेतन तसेच इतर सोयी सुविधाही नाकारल्या जात आहे. दिवाळी आधी बोनस देण्यासाठी कामगार संघटनांनी चर्चेची मागणी करूनही आयुक्त वेळ देत नाहीत. त्यामुळे कामगार हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.