बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्येच कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:24 AM2018-08-26T03:24:07+5:302018-08-26T03:24:39+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी पहाटे विकी महंतो या कामगाराने आत्महत्या केली.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी पहाटे विकी महंतो या कामगाराने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे मार्केटमधील परप्रांतीय कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी असलेला विकी मदन महंतो भाजी मार्केटमधील डी ३६३ गाळ्यात काम करत होता. शनिवारी पहाटे पोटमाळ्यावरील बाथरूमध्ये गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मनपा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी याच मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
भाजी मार्केटमधील डी विंगमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यापारी व कामगार काम करत आहेत. फळ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करत आहेत. या कामगारांची नोंद बाजार समिती व व्यापाºयांकडेही नाही. मार्केटमध्ये वास्तव्य करणाºयांची माहिती पोलिसांनाही देण्यात आलेली नाही. यामुळे मार्केटमधील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
भाजी मार्केटमध्ये एक आठवड्यापूर्वी परप्रांतीयांच्या दोन गटामध्ये राडा झाला होता. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एपीएमसी प्रशासनाने मार्केटमधील कामगारांचे सर्वेक्षण करावे. प्रत्येक कामगाराची नोंद ठेवण्यात यावी. मार्केटमध्ये उत्तरप्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारही वास्तव्य करत आहेत. त्या कामगारांची सविस्तर नोंद ठेवण्याची मागणीही होत आहे. कामगाराच्या आत्महत्येच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला असून आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासन कधी जागे होणार
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभारामध्ये वाढ होत आहे. मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये येणाºया जाणाºयांवर कोणाचेही निर्बंध राहिलेले नाही. मार्केटमध्ये गुन्हेगारांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन कधी जागे होणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
पहाटेची घटना : विनानोंदीत कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर