कोरोनामुळे गावाकडे गेलेले कामगार परतेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:17+5:302021-06-17T04:06:17+5:30
पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांचा वेग मंदावला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक पायाभूत सेवा-सुविधांची कामे ...
पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांचा वेग मंदावला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक पायाभूत सेवा-सुविधांची कामे सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पांमध्ये काम करणारे अनेक कामगार कोरोनामुळे मूळ गावी गेले आहेत. मात्र, असे असले तरी याचा प्रकल्पांच्या कामावर काहीही परिणाम झालेला नाही. प्रकल्पांची कामे किंचित कुठे तरी कमी वेगाने होत आहेत. मात्र, कोणत्याही प्रकल्पाचे काम थांबलेले नाही, असा दावा मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.
कुलाबा - वांद्रे - सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ मार्गाचे काम करतानाच आता मान्सून तयारी म्हणून अधिक काळजी घेण्यात येत असली, तरी या प्रकल्पांतर्गत काम करत असलेले अनेक कामगार कोरोनामुळे मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे आम्ही माेजक्याच कामगारांसह काम करत आहोत, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितले. सद्यस्थितीत प्रकल्पात एकूण ८ हजार ७७८ कामगार कार्यरत आहेत. सर्व कामगार कोविडसंबंधित राज्य सरकारतर्फे निर्धारित नियमांचे पालन करून कार्यरत आहेत, असेही कॉर्पोरेशनने सांगितले.
मुंबई महापालिकेतर्फे कोस्टल रोड तीन भागात बांधला जात आहे. आजघडीला प्रकल्पाच्या तिन्ही टप्प्यात २ हजार ८०० कामगार काम करत आहेत. कोरोनामुळे १०० ते १५० कामगार मूळ गावी गेले आहेत. मात्र, प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
* काम थांबलेले नाही
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्यावतीने मुंबई शहर आणि उपनगरात ९ मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाची कामे सुरू असून, उर्वरित प्रकल्पही वेगाने पूर्ण केले जात आहेत. कोरोना काळात प्रकल्पांच्या ठिकाणी काम करत असलेले कामगार मूळ गावी गेल्यामुळे प्रकल्पांच्या कामावर किंचित परिणाम झाला असला, तरी ते कुठेही थांबलेले नाहीत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने दिली.
---------------------------
..............................................