Join us  

कार्यकर्त्यांनो कामाला लागा!

By admin | Published: May 24, 2014 12:50 AM

मतदारांच्या भावनांशी खेळणार्‍या शेकापला महायुतीने पराजयाची धूळ चारली आहे.

उरण : मतदारांच्या भावनांशी खेळणार्‍या शेकापला महायुतीने पराजयाची धूळ चारली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही मावळ मतदार संघातून महायुतीचेच उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही देवून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा असे आवाहन मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण येथे केले. यावेळी निवडणुकीच्या दरम्यान पक्षापासून दूर गेलेले कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क साधून पक्षाशी जवळीक साधण्याचे काम केले जाणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला. यासाठी गुरुवारी (२२) चिरनेर, खोपटे आणि उरण शहरात महायुतीने जाहीर सभांचे आणि विजयी रॅलीचे आयोजन केले होते. जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून विजयी रॅलीला प्रारंभ झाला. सेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयी रॅली दरम्यान नतमस्तक होवून मतदारांचे आभार मानले. त्यांच्या सोबत रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख संतोष ठाकूर, गणेश शिंदे, परमानंद करंगुटकर, चंद्रकांत गायकवाड, नगरसेविका सुजाता गायकवाड तसेच महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या विजयी रॅलीत सहभागी झाले होते. राजीव गांधी सभागृहात झालेल्या जाहीर सभेत खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाचे श्रेय मावळ मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना दिले. शेकाप बाजारू आणि धंदेवाईक पक्ष बनल्याची टीकाही बारणे यांनी केली. उरणमधील सिडको, जेएनपीटी इतर प्रकल्पग्रस्तांचे आणि सेफ्टीझोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन बारणे यांनी दिले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ लोकसभेतील सर्वच विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही दिली. (वार्ताहर)