पावसाळी अधिवेशनात कामकाजाचे दिवस तेराच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:43 AM2018-06-20T05:43:02+5:302018-06-20T05:43:02+5:30
नागपुरात ४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप २० जुलै रोजी वाजणार आहे. प्रत्यक्ष कामकाज १३ दिवसांचेच असेल.
मुंबई : नागपुरात ४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप २० जुलै रोजी वाजणार आहे. प्रत्यक्ष कामकाज १३ दिवसांचेच असेल. अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी विधानभवनात झाली. त्यात अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. एकूण १७ दिवसांच्या अधिवेशनात शनिवार ७ जुलै,
रविवार ८ जुलै, शनिवार १४ जुलै, रविवार १५ जुलै असे चार दिवस सुट्टीचे असतील. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज तेराच दिवस चालेल. नवीन ९ आणि प्रलंबित १० अशी एकूण १९ विधेयके मांडण्यात येतील. विधान परिषदेतील एकूण ११ सदस्यांची मुदत संपत असल्याने विधान परिषदेत कामकाजाच्या शेवटच्या दिवशी संबंधित सदस्यांना निरोप दिला जाणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.