लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्यूटी संपवून घरी पोहोचताच तीन वर्षांचा मुलगा धावत येतो. आईने आपल्याला उचलून घ्यावे असे त्याला वाटते. पण, त्याचवेळी आजी पाठीमागून त्याला ओढून धरते. दोन महिन्यांच्या मुलीला भूक लागली तरी आई लवकर जवळ घेत नाही. मनावर दगड ठेवून आपल्या मुलांपासून दूर राहून सुरेखा (नाव बदललेले) रुग्णालयात मावशी म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात रुग्णालयात सेवा करुन घरी परतणाऱ्या या पालकांची कायमच घालमेल होताना दिसतेयॉ गेली दीड वर्ष सलग कोरोना संसर्गाच्या विरोधात आघाडीवर सुरेखा मावशीसारखी असंख्य माणसे लढा देत आहेत.
कोरोनाविरोधात फ्रंटलाईनवर लढणाऱ्या या माणसांचा संघर्ष कोरोनाची तीव्रता दर्शविणारा आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू होताच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा आणि पोलिस प्रशासन रात्रंदिवस कार्यरत आहे. संशयित रुग्णांना कोरोनाच्या जबड्यातून बाहेर आणण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय झटत आहेत. अशातच सुरेखा मावशी या सेंट जाॅर्ज रुग्णालयात गेली तीन वर्षे काम करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. पहिल्याच लाटेत कोरोनाचा संसर्गही झाल्यामुळे विलगीकरणाचा अनुभव हा अतिशय दुःखद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सुरेखा यांच्या पतीचा छोटेखानी व्यवसाय आहे, तर मावशी रात्रंदिवस रुग्णालयात सेवा करतात. दोघेही कर्तव्य बजावण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतात, तेव्हा गजेंद्र यांची साठ वर्षांची आई दोन नातवंडांचा सांभाळ करते. एरव्ही मुलांमध्ये रमणाऱ्या या आई-बाबांना आता मात्र मुलांपासून चार हात अंतर राखूनच राहावे लागते. काम आटोपून रात्री घरी गेल्यानंतर तीन वर्षांचा मुलगा धावत येतो. आईने आपल्याला कडेवर घ्यावे असा त्याचा हट्टच असतो. अर्थात, कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी हा त्याचा नित्यक्रमच होता. पण लोकांना सुरक्षित ठेवताना आपल्या माध्यमातून कासेरोनाचा संसर्ग घरापर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षताही मावशींना घ्यावी लागते असेही त्यांनी सांगितले.