मुंबई : मुंबई ही आपली कर्मभूमी असली तरी जन्मभूमी असलेल्या आपल्या गावाकडची ओढ अनेकांना असते. कोरोनाच्या संकटात आपल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील गृह विभागात कार्यरत असलेले नटराज ज्ञानदेव गावडे पुढे सरसावले आहेत.
गेली वर्षभर अनेकांच्या मदतीसाठी ते कार्यरत आहेत. १ जून रोजी असलेला वाढदिवस आणि कोरोनाच्या संकटात सांगली जिल्हा, तासगाव तालुक्यातील नागाव (नि) या आपल्या गावातील गावकऱ्यांना मदतकार्य करून गावडे यांनी वाढदिवस साजरा केला.
गावडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जन्मगावी नागाव (नि) जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाइन सेंटरमध्ये अनेक औषधे उपलब्ध करून दिली. वाफ घेण्याचे मशीन १०, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोव्हज व फेस शिल्ड आदी बरेच काही महत्त्वाचे लागणारे साहित्य दिले. तसेच मुंबईत ५०० पीपीई किट, २०० लीटर सॅनिटायझर, ५०० मास्क, २०० हॅन्ड ग्लोव्हज, फेस शिल्ड आदी साहित्य गावडे यांनी दिले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यंदा कोरोनाच्या संकटकाळात अनेक रुग्णांना औषधोपचार व रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात गावडे यांनी पुढाकार घेतला. तसेच रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी गावडे आजही अथक परिश्रम घेत आहेत.
सध्या गावडे हे मंत्रालयात गृह विभागात काम करत असून त्यांनी मुंबईत विविध भागात तसेच स्वतःच्या गावात स्वखर्चाने कोरोना साहित्याचे वाटप केले. शासकीय नोकरी करत असतानासुध्दा समाजाप्रति असलेली तळमळ पाहून गावडे हे तरुणांचा आदर्श ठरले आहेत.
-- - -- - - -------***--