Join us

नगरसेवकांनी दिली एकाच कंत्राटदाराला कामे; ठराव मंजूर न होताच कामांचे खरेदी आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नगरसेवक आपल्या प्रभागात विविध ठिकाणी या नावाखाली कामे करत असून, ही कामे प्रभागात प्रत्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नगरसेवक आपल्या प्रभागात विविध ठिकाणी या नावाखाली कामे करत असून, ही कामे प्रभागात प्रत्यक्ष तपासायला गेल्यानंतर सापडतच नाहीत. कारण त्यांचे ठिकाणच दिलेले नसते. २०१८-१९ या कालावधीत १० नगरसेवकांनी मिळून २ कोटी ५९ लाख ४४ हजार ४१३ इतका निधी विविध ठिकाणी या नावाखाली खर्च केला आहे. २०१९-२० या कालावधीत ११ नगरसेवकांनी मिळून १ कोटी २८ लाख ५ हजार १५० रुपये इतका निधी विविध ठिकाणी या नावाखाली खर्च केला आहे.

महाराष्ट्र दिनी नागरिकायन या संशोधन केंद्रातर्फे ‘माझा नगरसेवक, माझा प्रभाग’ या प्रकल्पांतर्गत मुंबई महापालिकेच्या ११ नगरसेवकांची २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीतील एकूण २२ प्रगतिपुस्तके प्रकाशित करण्यात आली. यामधील निरीक्षणानुसार, एकाच प्रकारच्या कामांवर सर्वाधिक निधी खर्च करणारी आकडेवारी धक्कादायक आहे. दुसरीकडे कोणत्याही एकाच कंत्राटदाराला अधिक कामे मिळू नये यासाठी ई-टेंडरिंगची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली. मात्र येथेदेखील अधिक रकमेची कामे एकाच कंत्राटदाराला दिली गेली आहेत.

-----------------------

एकाच कंत्राटदाराला कामे

२०१८-१९

प्रभाग क्रमांक ७२चे नगरसेवक पंकज शोभनाथ यादव, प्रभाग क्रमांक १७६ चे नगरसेवक सुवर्णा सहदेव करंजे आणि प्रभाग क्रमांक १९५चे नगरसेवक संतोष नामदेव खरात या तीन नगरसेवकांनी एकूण खर्चाच्या ५० टक्क्यांहून अधिक रकमेची कामे एकाच कंत्राटदाराला दिली आहेत.

२०१९-२०

प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक कमलेश शोभनाथ यादव, प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक प्रतिभा योगेश गिरकर आणि प्रभाग क्रमांक १९५चे नगरसेवक संतोष नामदेव खरात यांनी एकूण खर्चाच्या अनुक्रमे ५६ टक्के, ७१ टक्के आणि ७८ टक्के रकमेची कामे एकाच कंत्राटदाराला दिली आहेत.

-----------------------

ठराव मंजूर न होता कामांचे खरेदी आदेश

२०१९-२०

प्रभाग समितीत ठराव मंजूर न होताही कामांचे खरेदी आदेश निघतात. प्रभागात कामे केली जातात. अशा कामांची एकत्रित आकडेवारी तपासली असता ११ नगरसेवकांनी मिळून २०१९-२० या एका वर्षात १४ कोटी ४ लाख १४ हजार ९५६ रुपये इतका निधी खर्च केलेला आहे. ही एवढ्या कोटींची कामे प्रभाग समितीत मंजूर न होताही कशी काय केली जातात, त्यांना मंजुरी कशी मिळते, हे प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

-----------------------

विविध ठिकाणी खर्च

२०१८-१९

दहा नगरसेवकांनी मिळून २ कोटी ५९ लाख ४४ हजार ४१३ इतका निधी विविध ठिकाणी या नावाखाली खर्च केला आहे.

२०१९-२०

११ नगरसेवकांनी मिळून १ कोटी २८ लाख ५ हजार १५० रुपये इतका निधी विविध ठिकाणी या नावाखाली खर्च केला आहे.

-----------------------

नगरसेवक आणि त्यांची कामे

१. हाजी मोहम्मद हलीम खान

प्रभाग क्रमांक ९६चे नगरसेवक हाजी मोहम्मद हलीम खान यांची २०१९-२० या एका वर्षातील सर्वच प्रकारची उपस्थिती ही एकूण ११ नगरसेवकांमध्ये अतिशय धक्कादायक आहे. सर्वसाधारण सभेत ३६ टक्के, विशेष समितीमध्ये (बाजार व उद्यान समिती) १९ टक्के आणि प्रभाग समितीमध्ये फक्त १६ टक्के उपस्थिती आहे.

२. सुवर्णा करंजेकर

प्रभाग क्रमांक ११७च्या नगरसेवक सुवर्णा करंजेकर यांची २०१८-१९ मध्ये प्रभाग समितीत ३८ टक्के, तर २०१९-२० मध्ये फक्त ३१ टक्के उपस्थिती आहे.

३. प्रकाश गंगाधरे

एकूण ११ नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक १०४ चे नगरसेवक प्रकाश काशीनाथ गंगाधरे यांचा २०१८-१९ या कालावधीतील १ कोटी ८२ लाख ५८ हजार ८१२ (एकूण खर्चाच्या ४६ टक्के) रुपये निधी न वापरताच परत गेला आहे.

४. संतोष खरात

२०१९-२० या वर्षात संतोष नामदेव खरात यांचा १ कोटी ८९ लाख ९४ हजार ८१६ (एकूण खर्चाच्या ५१ टक्के) रुपये इतका निधी न वापरताच परत गेलेला आहे. खरात यांनी २०१८-१९ या कालावधीत एकूण ४८ लाख ३४ हजार रुपयांची कामे विविध ठिकाणी या नावाखाली केली आहेत.

५. सुवर्णा करंजे

प्रभाग क्रमांक ११७चे नगरसेवक सुवर्णा सहदेव करंजे यांनी सलग तीन वर्षे पॅसेज व ड्रेनेज सिस्टीममध्ये सुधारणा या एकाच प्रकारच्या कामावर सर्वाधिक निधी खर्च केला आहे. २०१७-२० या तीन वर्षांत मिळून ५ कोटी ११ लाख ४७ हजार ५८६ रुपये इतका निधी खर्च केलेला आहे.

६. दक्षा पटेल

प्रभाग क्रमांक ३६चे नगरसेवक दक्षा जगदीश पटेल यांनी २०१८-१९ या वर्षात फुटपाथ व गटार दुरुस्ती यासाठी १ कोटी ८४ लाख ३७ हजार ६६ रुपये इतका, तर २०१९-२० या वर्षात पाथवे व ड्रेनेज सिस्टीममध्ये सुधारणा यासाठी १ कोटी ८२ लाख ८६ हजार २४७ रुपये इतका सर्वाधिक निधी खर्च केलेला आहे.