मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ३०० कोटींची कामे, आतातरी शुद्ध पाणी मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:23 IST2025-02-03T14:05:12+5:302025-02-03T14:23:43+5:30
मुंबईच्या अनेक भागात पाणीगळती, कमी दाबाने पाणीपुरवठा आदि समस्यांशी सामना करावा लागत आहे.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ३०० कोटींची कामे, आतातरी शुद्ध पाणी मिळणार का?
मुंबई
मुंबईच्या अनेक भागात पाणीगळती, कमी दाबाने पाणीपुरवठा आदि समस्यांशी सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे यासंबंधीच्या सगळ्यात जास्त तक्रारी या पश्चिम आणि पूर्व उपनगरातून येत आहेत. त्यामुळे पालिकेने विविध विभागांतील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची आणि सिमेंट काँक्रीटीकरणाची जवळपास ३०० कोटींची कामे हाती घेतली आहेत. या वॉर्डात कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, मालाड, कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, दहिसर यांचा समावेश आहे.
मुंबईत जलवाहिन्यांचे मोठे जाळे पसरलेले आहे. या जलवाहिन्या संपूर्ण मुंबईत पाणीपुरवठा करतात. कालानुरुप या जलवाहिन्यांची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अनेकविध कारणामुळे त्यांना हानी पोहोचली आहे. याचा थेट परिणाम त्या जलवाहिनीतून संबंधित विभागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. अनेकदा या जलवाहिन्या फुटल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठाही नागरिकांना होतो. या सगळ्यावर उपाय म्हणून आवश्यकता आणि मागणी आहे त्या ठिकाणच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्त्या जलअभियंता विभागाकडून हाती घेण्यात येत आहेत.
१३४२ दशलक्ष लीटरची पाणीचोरी
मुंबईला होणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठ्यांपैकी १ हजार ३४२ दशलक्ष लीटर पाणीचोरीला सामोरे जावे लागते. हे प्रमाण दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या ३४ टक्के इतके आहे. बिगर महसूल पाण्याचे (नॉन वॉटर रेव्हेन्यू) प्रमाण ३८ टक्क्यांवरुन ३४ टक्के खाली आले आहे.
३८ टक्के बिगरमहसूल पाण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांवरुन ३४ टक्के खाली आले आहे. तरीही या प्रमाणात आणखी घट व्हावी यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालिका आयुक्तांनी जलअभियंता विभागाला दिल्या आहेत.
कोणत्या विभागाला किती निधी?
- एच पश्चिम (खार प.)- १२.१० कोटी
- एम पूर्व (गोवंडी)- २०.७३ कोटी
- एन (घाटकोपर)- २३.९६ कोटी
- एस (भांडूप प.)- २२.४ कोटी
- के पश्चिम (अंधेरी प.)- २१.३४ कोटी
- आर उत्तर (दहिसर)- १०.२८ कोटी
- पी दक्षिण (गोरेगाव प.)- १५.२५ कोटी
- टी (मुलुंड प)- ५.६१ कोटी
- एच पूर्व (सांताक्रूझ पू.)- १७.७५ कोटी
- पी उत्तर (मालाड)- १७.८५ कोटी
- आर. दक्षिण (कांदिवली प.)- १२.५८ कोटी
- आर मध्य (बोरिवली प.)- ९.२५ कोटी
- के पूर्व (अंधेरी पू.)- १६.७६ कोटी
- एल (कुर्ला)- २६.६८ कोटी
- एच पू. व प. (खार/सांताक्रूझ)- ७६.३५ कोटी