मुंबई : रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये, याचे धडे आपल्याच अभियंत्यांना देण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी आयआयटी या अभियंत्यांची २७ एप्रिलला कार्यशाळा घेणार आहे. ३०० अभियंत्यांना कार्यशाळेत तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहे. अभियंत्यांच्या विविध शंका, प्रश्न आदींचेदेखील निरसन ‘आयआयटी मुंबई’तील तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी करतील.
महानगरपालिकेने सध्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी पालिका विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी ही कार्यशाळा होत आहे.
आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यशाळेस भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील नामांकीत तज्ज्ञ प्रा. डॉ. के. व्ही. कृष्ण राव हे अभियंत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत अभियंत्यांना सिमेंट काँक्रिट रस्ते बांधणीचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पालिका बनली टीकेची धनी-
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेचे दरवर्षी कोटी रुपये खर्च होत आहेत. रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी असतात. सध्या काही पुलांच्या सदोष बांधकामांमुळे पालिका टीकेची धनी बनली आहे. प्रकल्पात शंकांचे निरसन करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी पालिकेला अलीकडच्या काळात वारंवार आयआयटीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागत आहे. आपल्या अभियंत्यांपेक्षा आयआयटीवरच पालिकेची मोठी मदार दिसत आहे.
पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे थंडावणार-
१) रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे.
२) काही भागांतील कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत तर, काही भागांतील निविदा काढल्या जाणार आहेत. अजूनही सर्वच भागांतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू झालेली नाहीत.
३) शहर भागातील कामे तर कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे रखडली होती. पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे थंडावणार आहेत.