मुंबई : जग कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असताना अनेक अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते जागतिक पातळीवर भारताला आपले स्थान बळकट करण्याची नामी संधी आहे. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली असून, नव्या आव्हानातही महाराष्ट्राला प्रमुख भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी गरज आहे ती परिस्थितीचा स्वीकार आणि आवश्यक ते बदल करून नव्या आत्मविश्वासाने मार्गक्रमण करण्याची. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीतून प्रगतीच्या दिशेने कशी उसळी घ्यायची हे जाणून घेण्याची संधी ‘वेबिनार सीरिज’च्या माध्यमातून लोकमतने आपल्या वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. ‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी’ अंतर्गत होणाऱ्या या विशेष वेबिनार सीरिजमध्ये मार्गदर्शनासाठी येणारे पहिले मान्यवर आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
१४ मे रोजी दुपारी ११ ते १.३० या वेळात होणाºया ‘एम्ब्रेसिंग दी न्यू नॉर्मल - द फ्यूचर आॅफ एमएसएमई सेक्टर’ या वेबिनारमध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी असतील. तर लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन आणि एडिटर इन चीफ विजय दर्डा, ‘नरेडको’ आणि ‘असोचेम’चे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, पूनावाला फायनान्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभय भुतडा, ‘आॅलइंडिया मॅन्युफॅक्चरिंग आॅर्गनायझेशन’चे माजी अध्यक्ष के. ई. रघुनाथन हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. एमएसएमई हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतात एमएसएमईची संख्या ६ कोटी ९० लाख असून देशाच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) त्यांचा वाटा २९ टक्के आहे. कोरोनाच्या संकटात हे उद्योगच सर्वाधिक भरडले गेले आहेत. सरकारने कर्जांच्या मासिक हप्त्यांंमध्ये थोडी सवलत दिली असली तरी आर्थिक अरिष्ट, कामगारांचा तुटवडा, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यासारखी असंख्य आव्हाने त्यांच्यासमोर उभी ठाकली आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना आणि सरकार विविध पातळ्यांवर धोरण निश्चित करत आहे. त्या बरोबरीने या उद्योजकांनीसुद्धा नव्या स्पर्धेसाठी स्वत:ला सज्ज ठेवायला हवे. नव्याने स्वीकाराव्या लागणाºया कार्यपद्धतीत जशी आव्हाने असतील तशी संधीसुद्धा असेल. या संधीचे सोने करताना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसमोर (एमएसएमई) कोणती आव्हाने उभी ठाकतील आणि त्यांचा समर्थपणे मुकाबला कसा करायचा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तो संभ्रम दूर करत यशाचे हे नवे शिखर कसे गाठायचे हे सांगण्यासाठी लोकमतने या विशेष वेबिनारचे आयोजन केले आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर रजिस्ट्रेशन केले जाईल. रजिस्ट्रेशनसाठी लिंक- https://bit.ly/3cqAzl8 आहे. कॉपी करा किवा इथे क्लिक करा. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आणि अन्य माहिती नोंदणी केलेल्या ई मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर पाठवली जाईल.