महेश चेमटे
मुंबई : एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभर योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या हिरकणी योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने 'लोकमतने' महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचा आढावा घेतला असता अकार्यक्षम अधिकारी, समनव्याचा अभाव, मनमानी कारभार यामुळे हिरकणी कक्ष असुविधेच्या गर्तेत अडकल्याचे स्पष्ट होत आहे. कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल आणि परळ स्थानकातील हिरकणी कक्ष अनेक महिन्यापासून बंद आहेत. प्रवाशांना विचारणा केल्यास स्तनपान करणाऱ्या महिला वर्गाची सोय करण्यात येते. सुरुवातीला या कक्षाला चांगला प्रतिसाद होता. मात्र, कक्षात स्तनपान करणाऱ्या प्रवाशांना फलाटावर लागलेल्या एसटीची माहिती मिळत नसल्याने महिला वर्गाकडून या कक्षाचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कक्ष बंद असल्याचे कुर्ला आणि परळ येथील एसटी अधिकाऱ्यांनी गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
एसटी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधला असता, राज्यातील 250 एसटी स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश मुख्यालयाने दिले होते. त्यापैकी मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सारख्या एसटी स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र त्याबाबत जनजागृती न झाल्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. दरम्यान, काही स्थानकांवर पुरुषासाठी असलेले विश्रांतीगृहाचे रुपांतर महिलांसाठी असलेल्या हिरकणी कक्षात करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्षाबाबत महामंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, महिला प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या हिरकणी योजनेबाबत परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता, 'सध्या याबाबत माहिती नसून, माहिती घेऊन बोलतो' असे सांगण्यात आले.
राज्यातील शिवशाही ते परिवर्तन (साधी) अशा एकूण 18 हजार एसटी मधून सुमारे 70 लाख प्रवाशांच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला रोज सुमारे 18 ते 20 कोटींचे उत्पन्न मिळते.