मुंबई : तब्बल १२५ वर्षानंतर माथेरानमध्ये करण्यात आलेल्या फुलपाखरांच्या अभ्यासात १४० प्रजातींची नोंद झाली आहे. तर डबल ब्रँडेड क्रो ही फुलपाखराची प्रजाती पहिल्यांदाच माथेरानमध्ये आढळली असून, तीन मुंबईकर तरुणांनी माथेरानमधील फुलपाखरांचे विश्व उलगडले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचेसंशोधक मंदार सावंत, डॉ. निखिल मोडक आणि विद्याविहार येथील सौमय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर सारंग अशी या तिघांची नावे आहेत. बल्गेरिया येथील ‘बायोडायर्व्हसिटी डाटा जर्नल’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याबाबतचा संशोधन प्रकल्प प्रसिध्द करण्यात आला आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकारात फुलपाखरांच्या १६ प्रजातींची नोंद देखील अभ्यासात झाली आहे.
माथेरामध्ये १८९४ साली जे.ए. बेथॅम या ब्रिटीश अधिका-याने फुलपाखरांचा अभ्यास केला होता. तेव्हा त्यांनी फुलपाखरांच्या ७८ प्रजातींची नोंद केली होती. या अभ्यासानंतर बेथॅम असे म्हणाले होते की आता जेव्हा केव्हा माथेरानमधील फुलपाखरांचा अभ्यास होईल तर तो मुंबईकरांकडूनच होईल. त्यामुळे नुकतेच झालेल्या अभ्यासामुळे योगायोगाने का होईना बेथॅम यांचे म्हणणे खरे ठरले असून, हे तिन्ही संशोधक मुंबईचे आहेत. मुंबईकर तरुणांनी माथेरानमध्ये सप्टेंबर २०११ पासून मार्च २०१९ पर्यंत असा आठ एक वर्षे फुलपाखरांचा अभ्यास केला. पावसाळा, हिवाळा आणि ऊन्हाळ्यात अभ्यास सुरु असलेल्या आठ ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. प्रत्येक महिन्यातील तीन ते चार दिवस अभ्यास सुरु होता. या अभ्यासात फुलपाखरे चिखलावर बसतात. यातून ती न्युट्रीशन घेत असली तरी ती चिखलावर जगत नाहीत. फुलपाखरे मृत साप, खेकड्यांवर बसतात. पक्ष्यांच्या विष्ठेसह सडलेल्या फळांवर बसतात. झाडांच्या डिंकातून फुलपाखरे न्युट्रीशन घेतात. यास खाद्यग्रहण असे म्हणतात, असे लक्षात आले. फुलपाखरे ऊनं खात असल्याचे देखील त्यांच्या वागणूकीतून लक्षात आले. न्युट्रीशनमधील काही घटक नर फुलपाखराकडून मादी फुलपाखराला संबंधावेळी प्रदान केले जातात. माणसाच्या विष्ठेपासून जनावरांच्या विष्ठेवरदेखील फुलपाखरे बसत असल्याचे अभ्यासात निदर्शनास आले. कोणते फुलपाखरु कोणत्या ऋतूमध्ये आढळते? याची माहिती गोळा करण्यात आली. फुलपाखरांची वागणूक आणि फुलपाखरांची खाद्य ग्रहण करण्याची पद्धत समजावून घेण्यासाठी कलर बारकोडिंग सिस्टीम करण्यात आले आहे.
----------------------------
येथे झाला अभ्यास
सिम्पसॉन टँककॅरेलॉट लेकपनरोमा पॉइंटगारबेट पॉइंटरुस्तुमजी पॉइंटवन ट्री हिल पॉइंटनेरळ माथेरान रेल रुटनेरळ माथेरान रोड वे