जागतिक कॅन्सर दिन : लवकर निदान, उपचारातून कॅन्सरविरुद्ध द्या लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:49 AM2022-02-04T08:49:54+5:302022-02-04T09:08:02+5:30
डॉ. कैलास शर्मा (अधिष्ठाता, प्रकल्प टाटा मेमोरिअल हॉस्पिटल) यांची मुलाखत.
डॉ. कैलास शर्मा (अधिष्ठाता, प्रकल्प टाटा मेमोरिअल हॉस्पिटल) यांची मुलाखत.
प्रश्न : २०२२ ते २४ च्या कॅन्सरदिनाचे औचित्य?
कॅन्सरचे लवकर निदान आणि उपचार झाले तर रुग्ण अनेक वर्षे चांगले आयुष्य जगू शकतो. यासाठी जनजागृती आणि परवडणारी व सहज उपलब्ध असणारी कॅन्सर निदान व उपचारांची सुविधा आवश्यक आहे. महाराष्ट्रात २०२० मध्ये सुमारे एक लाख कॅन्सरचे रुग्ण असल्याचे अनुमानीत आहे. बहुतांश रुग्ण उशिरा उपचारांसाठी येतात. पुरुषांमध्ये मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक, स्रियांमध्ये स्तनाचा, अंडाशयाचा (ओव्हरी) आणि ग्रामीण भागात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतो. कॅन्सरच्या निदानामध्ये, उपचारांमध्ये प्रचंड क्षेत्रीय असमानता आहे. याची प्रमुख कारणे- अज्ञान, दुर्लक्ष करणे, उपचार न परवडणे/जवळपास उपलब्ध नसणेही आहेत.
प्रश्न : टाटा मेमोरियल हॉस्पिटलतर्फे देशातील कॅन्सर निर्मूलनासाठीचे प्रयत्न?
टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे सर्वात मोठे कॅन्सर निदान व उपचाराचे केंद्र आहे. दरवर्षी सुमारे ६५ लाख नवीन आणि ६ ते ७ लाख जुन्या कॅन्सरचे रुग्ण येथे येतात. कॅन्सरचे उपचार परवडण्याजोगे व सहज उपलब्ध असण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे सतत प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यांत किमान एक मोठी कॅन्सर संस्था स्थापन करायची व तिच्या आजूबाजूला दोन रुग्णालये उपचारांसाठी तयार करायचे असे त्यांचे नियोजन आहे. वाराणसी, विशाखापट्टणम, मुजफ्फरपूर आणि गुवाहाटी येथे कॅन्सर रुग्णालये सुरू केली आहेत. भुवनेश्वरला प्रस्तावित आहे.
प्रश्न : सध्याचे आपले प्रकल्प?
बी.जे. मेडिकल कॉलेज (पुणे) आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (नागपूर)येथे १०० खाटांचे रुग्णालय आम्ही सुरू करीत आहोत. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय व आयुक्त वीरेंद्र सिंग हे खूप प्रोत्साहनपर सहकार्य करीत आहेत. जालना येथे आरोग्य संचालनालयातर्फे १०० खाटांचेे रुग्णालय औरंगाबाद कर्करोग संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
-डॉ. मंगला बोरकर
प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद
औरंगाबादच्या राज्य कर्करोग संस्थेची वाटचाल?
साडेआठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या औरंगाबादच्या राज्य कर्करोग संस्थेत आतापर्यंत लाखो लोकांनी उपचार घेतले आहेत. यासाठी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागिनाळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड हे खूप कष्ट घेत आहेत. संस्था अधिक बळकट व सुसज्ज करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये नवीन एमआरआय, सीटी स्कॅन, यावर्षी पेटस्कॅन मिळण्यासाठी मी मुंबईत संचालनालयात प्रयत्नशील आहे.