खुणावते कपड्यांची दुनिया
By admin | Published: June 4, 2016 01:55 AM2016-06-04T01:55:06+5:302016-06-04T01:55:06+5:30
तुमचा फॅशन सेन्स भन्नाट असेल आणि तुम्हालाही स्केचेसमधील कॉस्च्युम प्रत्यक्षात उतरवायला आवडत असेल तर तुम्ही ‘फॅशन डिझायनर’ होऊ शकता.
मुंबई : तुमचा फॅशन सेन्स भन्नाट असेल आणि तुम्हालाही स्केचेसमधील कॉस्च्युम प्रत्यक्षात उतरवायला आवडत असेल तर तुम्ही ‘फॅशन डिझायनर’ होऊ शकता.
कलाकौशल्य आणि फॅशन सेन्सवर आधारित असलेल्या फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक ‘ग्लॅमरस’ होत आहे. चित्रकला आणि फॅशनची पारख असलेले विद्यार्थी या क्षेत्राकडे वळू शकतात. फॅशन डिझायनिंगसाठी अर्धवेळ अभ्यासक्रम तसेच अनेक पदविका अभ्यासक्रम विविध शिक्षण संस्थांमध्ये घेतले जातात. त्यात ‘कॉस्च्युम स्टायलिंग आणि फोटोग्राफी’, ‘पर्सनल स्टायलिंग अॅण्ड इमेज कन्सल्टन्सी’, ‘पोर्टफोलियो डेव्हलपमेंट’, ‘फॅशन अॅण्ड इलस्ट्रेशन’, ‘फॅशन मार्केटिंग अॅण्ड मर्चंडाईज’, ‘फॅशन अॅण्ड टेक्सटाइल डिझायनिंग डिप्लोमा’ असे पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम ३ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत पूर्ण करता येतात.
फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीदेखील मिळवता येते. तीन ते चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम विविध नामांकित संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय दोन वर्षांची मास्टर्स डिग्रीची व्यवस्थाही अनेक संस्थांमध्ये आहे. पदविका आणि पदवी मिळवल्यानंतर तुम्हाला नोकरी करता येऊ शकते. शिवाय फॅशन डिझायनिंगमध्ये एमबीए ही पदवीदेखील घेता येऊ शकते. या क्षेत्रात बरेच विषय आहेत. ज्यामध्ये स्पेशलायझेशन करता येऊ शकते. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करणे शक्य आहे. (प्रतिनिधी)
पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमाच्या प्रवेशापूर्वी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा फॅशन सेन्स आणि चित्रकला गुणांची चाचपणी केली जाते. त्यानुसारच त्यांची निवडही करण्यात येते.
करिअरच्या संधी : फॅशन डिझायनर झाल्यानंतर फॅशन बुटीक, टेक्सटाईल कंपनीमध्ये डिझायनर म्हणून नोकरी मिळू शकते. नाटक, सिनेमा येथील कॉस्च्युम डिझायनर म्हणूनही फॅशन डिझायनर काम करू शकतात. शिवाय स्वत:चे स्वतंत्र बुटीकदेखील उघडू शकता. स्वत:चा फॅशन ब्रॅण्डदेखील तुम्ही तयार करू शकता.
प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
इंडियन फॅशन अॅकॅडमी, दादर
डब्ल्यूएलसीआय कॉलेज आॅफ फॅशन डिझायनिंग, लोअर परळ
सासमिरा महाविद्यालय, वरळी
आयटीएम इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, ओशिवरा
झारापकर महाविद्यालय, दादर
जे.डी इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन डिझायनिंग, वाशी
इंडियन फॅशन अॅकॅडमी, नौपाडा, ठाणे
शिवाय अनेक खासगी शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो.