मुंबई : गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करणाऱ्या संस्थेसाठी आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या कलाकारांच्या कला प्रदर्शनाला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. एकूण ११४ कलाकृतींचे प्रदर्शन पाहताना मुंबईकरांनी या प्रदर्शनातील सहभागी कलाकारांना दाद दिली.
संस्कृती आर्ट्सच्या वतीने अंधेरी येथील कोहिनूर कॉन्टीनेंटल येथे पार पडलेल्या या कला प्रदर्शनमध्ये गोराई येथील प्रगती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृती लक्षवेधी ठरल्या. २४ ते ३० एप्रिलदरम्यान पार पडलेल्या या कला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सलोनी सावंतने रेखाटलेले चित्र कॅनडाच्या कलाप्रेमीने विकत घेतले. विशेष म्हणजे या कला प्रदर्शनाद्वारे मिळणारे उत्पन्न गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन (आयडीएफ) या संस्थेला दान करण्याचा निर्णय सर्व कलाकारांनी घेतला.
या प्रदर्शनाचा हेतू लक्षात येताच कलाप्रेमींनीही यामध्ये हातभार लावला. या वेळी सलोनी सावंतव्यतिरिक्त सलोनी मसुरकर आणि नंदिनी दळवी यांच्या कलाकृतींचीही विक्री झाली. प्रगती विद्यालयाचे कला शिक्षक मनोहर बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कला प्रदर्शनामध्ये हरिश आपटे, प्रथमेश घोलप, सिद्धार्थ डोळस, सागर पाटणकर, सुश्मिता नारकर, लक्ष्मण भोसले, निशा कुरतडकर, रामकृष्ण लोखंडे, अनिकेत देवरे, अर्चना ठाकूर आणि संकेत पांचाळ यांच्या कलाकृतीही लक्षवेधी ठरल्या.