वर्ल्ड इमोजी डे... मानवी भावनांना कैद करणाऱ्या 'या 5 स्माईली'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 09:55 AM2018-07-17T09:55:45+5:302018-07-17T11:56:39+5:30
माणसाचे आयुष्य डीजिटल बनले असून प्रत्येक गोष्ट आपण चिन्हांतून व्यक्त करत आहोत. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो. इमोजींच्या वापरामुळे आपले आयुष्य भावनाशून्य तर बनले नाही ना ?
मुंबई - 17 जुलै हा दिवस जगभरात 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा करण्यात येतो. आजकाल माणसाचे आयुष्यच डीजिटल बनले असून प्रत्येक गोष्ट आपण चिन्हांतून व्यक्त करत आहोत. सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो. व्हॉट्सअॅपवर सर्रासपणे भावना व्यक्त करताना आपण इमोजीचाच वापर करतो. त्यामध्ये प्रेम, राग, आश्चर्य, हसू आणि आसूही आपण इमोजीतूनच व्यक्त करतो. मानवी भावनांना कैद करणाऱ्या या 5 इमोजी आपल्या दैनिक गरजेचा भाग बनला आहे.
जगभरात पहिली इमोजी 'स्माईली' आहे. हसण्याने सुरुवात झालेल्या या इमोजींची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच आता केवळ स्माईलीपुरतीच इमोजी मर्यादीत राहिली नसून अनेक वेगवेगळ्या भावनांच्या इमोजी तयार झाल्या आहेत. व्हॉट्सअॅप चॅटींगमध्ये या इमोजींचा दैनिक वापर वाढला आहे. युवक वर्गात प्रामुख्याने शब्दांऐवजी इमोजी चॅटला प्राधान्य दिले जाते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी चॅट करताना अनेकदा इमोजीतूनच संवाद साधला जातो. त्यामध्ये, लव्ह, लाईक, राग, हसू आणि आसू या पाच इमोजींना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळेच की काय, फेसबुकनेही केवळ लाईकपुरते मर्यादित न राहता युजर्संसाठी 5 इमोजींचा पर्याय सुरु केला. त्यामध्ये लाईकसह लव्ह (प्रेम), वाव (आश्चर्य), अँग्री (राग), स्माईल (हसू) आणि क्राईंग (रडू) या पाच भावनांचा समावेश केला आहे. त्यामुळेच फेसबुकवर भावनांना व्यक्त करण्यासाठी कमेंटऐवजी या 5 इमोजींचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर फेसबुकवर करण्यात आलेल्या अनेक कमेंटमध्येही या पाच इमोजींचा वापर केलेला दिसतो.