जागतिक पर्यावरणदिन विशेष : वन्य प्राण्यांचे संचार मार्ग धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:45 AM2018-06-04T02:45:13+5:302018-06-04T02:45:13+5:30
मानवाचा खरा मित्र निसर्ग आहे; परंतु याच निसर्गाची मानवाच्या हातून कत्तल केली जात आहे. जंगलतोड, विविध प्रस्तावित प्रकल्प, खाणी, उद्योगधंदे इत्यादी कारणांमुळे वन्यजीव विस्कळीत झाले आहेत.
- सागर नेवरेकर
मुंबई : मानवाचा खरा मित्र निसर्ग आहे; परंतु याच निसर्गाची मानवाच्या हातून कत्तल केली जात आहे. जंगलतोड, विविध प्रस्तावित प्रकल्प, खाणी, उद्योगधंदे इत्यादी कारणांमुळे वन्यजीव विस्कळीत झाले आहेत. परिणामी, वन्यजीवांचे स्थलांतर मानवी वस्तीमध्ये होऊ लागले. जंगलामध्ये वन्यजीवांचे संचार मार्ग सध्या धोक्यात येऊ लागले आहेत. सध्या देशात ४ ते ५ टक्के जंगले शिल्लक आहेत. मुंबईपासून ते कोकणापर्यंतच्या जंगलांत विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामुळे वन्यजीवांचे संचार मार्ग धोक्यात येऊ लागले आहेत. अभयारण्यातील संचार मार्ग आबाधित राहाण्यास पर्यावरणतज्ज्ञांनी आवाज उठवला आहे.
कर्नाळा, भीमाशंकर, कोयना, चांदोली, राधानगरी, किल्लारी, गोवा आणि कर्नाटकातील सीमेवरील अभयारण्ये ही एकमेकांना जोडलेली आहेत. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी रस्त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. कर्नाळा अभयारण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग-१७चे चौपदरीकरण सुरू आहे. याशिवाय मल्टीमॉ्युल प्रकल्प, गुजरात-मुंबई महामार्ग, मुंबई-नागपूर महामार्ग यासह इतर प्रकल्पांमुळे जंगलातील संचार मार्ग खंडित होत आहेत.
वन्यजीवांच्या संचार मार्गांना सर्वात मोठा धोका खाणींचा आहे. सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साइड आढळून येतो. कोल्हापूर, सिंधुदुर्गपर्यंत बॉक्साइडच्या खाणी आहेत. तसेच बॉक्साइड पर्वतावर आढळतात. त्यामुळे पर्वतावरसुद्धा खोदकाम केले जाते. त्यामुळे पर्वतावरील सर्व प्राणी पायथ्याशी येऊ लागले. कोकणात शेतामध्ये गवा रेड्यांचा धुडगूस जो सुरू आहे, तो या खाणींमुळेच सुरू आहे.
दुसरी समस्या म्हणजे पर्वतावर खाणकाम केल्यामुळे पाण्यासोबत दूषित रसायने वाहून पायथ्याशी असलेल्या तलावात साचतात. त्यामुळे येथील तलावातील पाणी बऱ्याचदा लालसर रंगाचे
दिसते. त्यामुळे येथील तलाव
दूषित झाले आहेत, अशी माहिती सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे यांनी दिली.
‘रबराची लागवड’चा कहर
सिंधुदुर्ग ते कोल्हापूरच्या जंगलात ‘रबर प्लॅन्टेशन’ सुरू आहे. यात लोकांच्या शेतजमिनी घेऊन त्यात रबराची लागवड केली जाते. कोकण भागात मालकी हक्काच्या जमिनी खूप आहेत. कोकणात जंगलभागात शेती केली जात नसल्याने संपूर्ण जंगल निर्माण होते. रबर लागवडीमध्ये जास्त पैसे मिळत असल्याने मालकीची जंगले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मालक स्वत:ची जमीन दुसºयाला देऊन त्यात रबर लागवड केली जाते. रबर लागवड करताना संपूर्ण जंगल कापून टाकले जाते. संवेदनशील जंगलात जर असे प्रकार होत असतील, तर हे सर्व वन्यजीवांसाठी घातक आहे. शासन हा धोका थांबण्याच्या विचारसुद्धा करत नाही, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञांनी दिली.
प्रकल्पांचे बायपास करा
वन्यजीवांचे संचार मार्ग आबाधित राहण्यासाठी पर्यावरण कायद्यांतर्गत रबर प्लॅन्टेशन आणि जंगलतोड या दोन्ही गोष्टी थांबविल्या पाहिजेत. काही प्रकल्पांचे बायपास केले पाहिजे.
(उदा. कर्नाळा अभयारण्यातून जाणार जो राष्ट्रीय महामार्ग १७ आहे.
याला बायपास करून आपण कर्नाळा अभयारण्य वाचवू शकलो असतो. परिणामी, इथला संचार मार्ग खंडित झाला नसता.) रस्त्यांच्या प्रकल्पावर जंगलांना धक्का न लावता कामे केली पाहिजेत.
जंगलातून रस्ता तयार करायचा असेल, तर जमिनीच्या भूगर्भातून हा प्रकल्प केला पाहिजे. या वेळी मात्र पैशांचा विचार करून चालणार नाही.
वन्यजीवांचा अभ्यास गरजेचा
कॅनॉन प्रकल्पामध्ये जंगलातील पाण्याच्या कालव्यावर पूल बांधला जातो. याला ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पासेस’ असे म्हटले जाते. यावर खबरदारीचे उपाय सुचवून समस्या सोडवू शकतो. किती वन्यप्राणी, किती प्रजाती, स्थलांतराचे मार्ग इत्यादीचा अभ्यास करून ओव्हर पासेसचे काम केले पाहिजे.
विकासकामांचा कांदळवनाला धोका
विविध प्रस्तावित विकासकामांमुळे मुंबई शहरातील कांदळवने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. त्सुनामी, वादळे, मोठ्या लाटा, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याचे काम कांदळवन क्षेत्र करत असते. त्यामुळे समुद्रकिनाºयालगतचे कांदळवन क्षेत्र वाचविणे गरजेचे आहे; परंतु विकासकामाच्या नावाखाली तिवरांची कत्तल सुरू आहे. यामुळे मुंबईतील विकासात्मक प्रकल्प पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत.
जंगली हत्तीचा मानवी वस्तीत वावर
कर्नाटकच्या जंगलातून हत्ती सरळ कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यात येतात. कारण कर्नाटक, गोवा आणि राज्यातील अभयारण्यांचा संचार मार्ग टिकून आहे. जर जंगलांची तोड, रबर प्लॅन्टेशन, खाणीचे खोदकाम करत असू, तर साहजिकच हत्ती मानवी वस्तीत घुसखोरी करून नासधूस करणार. हत्तींचा एक विशिष्ट मार्ग असतो. त्याच मार्गाने हत्ती येतात आणि जातात. जर का हे मार्ग खंडित होत गेले तर हत्ती इथेच कुठे तरी राहून तेथील मानवी वस्तींना त्रास देऊ लागतील.
संचार मार्ग हा नॅशनल पार्क आणि त्याच्या बाहेरचे क्षेत्र असते, तसेच संचार मार्ग बºयाचदा वन जमिनीत नसतो. वन्यप्राणी एका अभयारण्यातून दुसºया अभयारण्यात जातो. यासाठी वन्यप्राणी जो मार्ग वापरतात, त्याला ‘संचार मार्ग’ असे म्हटले जाते; परंतु संचार मार्गांच्यामध्ये विकासकामे सुरू झाली तर मग संचार मार्ग अवरुद्ध होतो.
-डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवन संरक्षक, ठाणे वनविभाग
अभयारण्य ही कल्पना तपासली गेली पाहिजे. अभयारण्ये पूर्वी होती का? तर नव्हती. अभयारण्यांची तेव्हाच कल्पना आली, जेव्हा औद्योगिकीकरण, शहरीकरण, यंत्रधारीत, रसयानधारीत प्रकल्प सुरू झाले. अभयारण्याला भय हे आधुनिक माणसांपासून आहे. पूर्वी गावांच्या भोवती जंगले होती. कालांतराने रेल्वे आल्याने वन्यप्राण्यांचे कॉरिडोरच नाहीसे होऊ लागले. वन्यजीवांचे कॉरिडोर या आधुनिक माणसाला ठाऊकच नाहीत.
- गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ
वन्यजीवांचे संचार मार्ग आबाधित राहिले नाहीत, तर ते एका विशिष्ट जागेत राहूनच संपणार आहेत. वाघ हा प्राणी याला कॉरिडोर लागते. वाघ मोठा झाला की त्याला दुसºया जागेत जाऊन आपले साम्राज्य वाढवायचे असते. जर वाघासारख्या प्राण्याला दुसºया ठिकाणी जायला मिळाले नाही, तर मानव-प्राणी संघर्ष होत राहणार.
- डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ