जागतिक दृष्टीदान विशेष - महाराष्ट्र नेत्रदानात बॅकफूटवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:57 AM2019-06-10T06:57:41+5:302019-06-10T06:58:28+5:30

केवळ ३८,३१४ नेत्रसंकलन : गेल्या पाच वर्षांतील प्रमाण असमाधानकारक

World Exposure Special - Maharashtra eyeball backfight! | जागतिक दृष्टीदान विशेष - महाराष्ट्र नेत्रदानात बॅकफूटवर!

जागतिक दृष्टीदान विशेष - महाराष्ट्र नेत्रदानात बॅकफूटवर!

googlenewsNext

स्नेहा मोरे 
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात नेत्रदान प्रोत्साहन आणि संकलनाचे कार्य केले जाते. शासकीय आणि अशासकीय पातळीवरही काही स्वयंसेवी संस्था नेत्रदानाविषयी जनजागृती करताना दिसून येतात. मात्र असे असूनही गेल्या पाच वर्षांत नेत्रदानात महाराष्ट्र बॅकफूटवर असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अहवालानुसार पाच वर्षांत केवळ ३८ हजार ३१४ नेत्रसंकलन झाले आहे. राष्ट्रीय पातळीवर तामिळनाडू हे राज्य नेत्रसंकलनात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात जवळपास ६६ नेत्रपेढ्या, १३२ नेत्र प्रत्यारोपण केंद्रे व ६४ नेत्र संकलन केंद्रे आहेत. राज्यात २०१७-१८ या कालावधीत ७ हजार ५६० एवढे नेत्रसंकलन करण्यात आले. नेत्रदानाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच काही सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवत आहेत. तरीही राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पश्चात होणारे नेत्रसंकलन यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करून मृत्यूनंतर नेत्रदान प्रक्रिया सुलभ असून, त्याविषयी समाजात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे.
याविषयी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शंकर रेणोसे यांनी सांगितले की, राज्यात दरवर्षी अंदाजे साडेआठ लाख लोकांचा मृत्यू होतो, परंतु त्यातून ०.८ टक्के लोकांचे नेत्रदान केले जाते. मृत्यूपश्चात सहा तासांच्या आत नेत्रदान व्हायला हवे अन्यथा डोळ्यांतील कॉर्निया (नेत्रपटल) प्रत्यारोपणासाठी उपयोगी राहत नाही. याखेरीज, समाजात आजही नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा असल्यामुळे हे प्रमाण वाढत नाहीय. यात नेत्रदान केल्यास पुनर्जन्म मिळणार नाही. मोक्ष किंवा स्वर्गात जागा मिळणार नाही अशा समजुती आहेत. त्याचप्रमाणे, मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसेल अशीही कुटुंबीय, नातेवाइकांमध्ये भीती असते, हे सर्व गैरसमज दूर होण्यासाठी प्रभावी जनजागृती व प्रचार-प्रसार केला पाहिजे.

वर्ष नेत्रसंकलन
२०१७-१८ ७,५६०
२०१६-१७ ७,५१४
२०१५-१६ ७,३०१
२०१४-१५ ८,२८६
२०१३-१४ ७,६५३

तामिळनाडू आघाडीवर

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात देशपातळीवर तामिळनाडू हे राज्य नेत्रसंकलनात सातत्याने आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांत या राज्याने ५६ हजार २०८ नेत्रसंकलन केले आहे. तर २०१७-१८ साली तामिळनाडूत १२ हजार ३४९ एवढे नेत्रसंकलन झाल्याचे अहवालात नोंद आहे.

मृत्यूपूर्व नेत्रपेढीत इच्छापत्र भरून संकल्पाद्वारे नेत्रदान करता येते. मरणोत्तर नेत्रदानाचे ठरावीक नमुन्यातील इच्छापत्र कुटुंबीय व जवळच्या नातेवाइकांच्या समक्ष भरून दिल्यानंतर दात्यास एक ओळखपत्र दिले जाते. नेत्रदात्याचा जेव्हा केव्हा मृत्यू येईल तेव्हा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष नेत्रपिढीला जाऊन नेत्रपिढीशी संपर्क साधणे गरजेचे असते. डॉक्टर येण्यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. मृतदेह ज्या ठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे. जेणेकरून मृतकाचे डोळे कोरडे पडणार नाहीत.
शक्य झाल्यास नेत्रदात्याच्या डोळ्यात अँटीबायोटिक्स ड्रॉप्स टाकून डोळे बंद करावे. डोळ्यांवर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात. नेत्रदात्याचे डोके ६ इंच उंच राहील, अशा स्थितीत ठेवावे. नेत्रदात्याच्या संकल्पपूर्तीसाठी सहा तासांच्या आत तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरावीक वेळेपूर्वी डोळे काढून नेत्रपेढीत जमा करणे आवश्यक असते.

नेत्रपेढ्यांतील ४० टक्के नेत्र वाया
नेत्रदानाविषयी प्रभावी जनजागृतीच्या अभावी महाराष्ट्र नेत्रदानात मागे असल्याचे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात दिसून आले आहे. त्याचप्रमाणे नेत्रदानाविषयी आणखी गंभीर बाब म्हणजे, नेत्रपेढ्यांमध्ये संकलित होणाऱ्या नेत्रांपैकी ४० टक्के नेत्र वाया जात असल्याची धक्कादायक माहिती आय बँक असोसिएशन आॅफ इंडियाने दिली आहे. याकरिता विविध सामाजिक आणि वैद्यकीय स्थिती कारणीभूत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. विविध कारणांनी दृष्टी गेलेल्या काही रुग्णांवर नेत्रप्रत्यारोपण हा प्रभावी मार्ग ठरतो. पण यासाठी असलेली प्रतीक्षा यादीतील रुग्णांची संख्या वाढत असताना नेत्रपेढ्यांचे कार्य मात्र मंदावत असल्याचेही आय बँक असोसिएशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष मेजर जनरल डॉ. जे.के.एस. परिहार यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, आपल्या येथे नेत्रदानाविषयी जनजागृती नसल्यामुळे याबाबत पुढाकार घेतला जात नाही. तसेच, तरुण नेत्रदातेही अत्यंत कमी असतात. त्यामुळे बºयाचदा नेत्रदाते ज्येष्ठ असतात, त्यांचे कॉर्निया आधीच फारसे निरोगी अवस्थेत नसल्याने नेत्रपेढीत संकलित करताना अडथळे निर्माण होतात. शिवाय, मृत व्यक्तीचे कॉर्निया नेत्रपेढीपर्यंत पोहोचण्यासही बराच कालावधी जातो. त्यामुळे कॉर्निया वाया जाण्याचा धोका संभवतो. आपल्याकडील नेत्रपेढीतील यंत्रणाही परदेशातील यंत्रणेइतक्या सक्षम नाहीत, त्यांच्याकडे ठरावीक काळापर्यंत कॉर्निया जतन केले जाते. त्यामुळे या नेत्रपेढ्यांचेही अद्ययावतीकरण होणे गरजेचे आहे. देशात दरवर्षी जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक नेत्रपटलांची (कॉर्नियाची) आवश्यकता आहे. त्या तुलनेत सध्या केवळ ४०-४५ हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. भारतात दरवर्षी वरील कारणास्तव व आजारामुळे २० लाख लोक आपली दृष्टी गमावत असतात. यावर उपाय म्हणजे अपारदर्शक बुब्बुळ काढून त्याऐवजी दात्याचे बुब्बुळ प्रत्यारोपणाद्वारे आलेले अंधत्व दूर करणे होय. कॉर्निया रोपणाद्वारे दृष्टीदान मिळावे यासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांची देशातील संख्या ५० लाखांच्या जवळपास असून यात २६ टक्के मुले आहेत.
 

Web Title: World Exposure Special - Maharashtra eyeball backfight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई