धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 06:09 PM2024-01-01T18:09:29+5:302024-01-01T18:09:59+5:30

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी ही तज्ज्ञांची टीम मास्टर प्लान तयार करणार आहे. 

World famous designer will create master plan of Dharavi | धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार व तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी ही तज्ज्ञांची टीम मास्टर प्लान तयार करणार आहे. 

डीआरपीपीएल प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर तसेच सासाकी ही रचनाकार फर्म आणि बुरो हॅपोल्ड या सल्लागार कंपनीसोबत भागीदारी करत आहे. याशिवाय, सिंगापूरमधील तज्ज्ञ देखील या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. हे सर्व धारावीच्या रहिवाशांसाठी जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दिशेने काम करतील. 

मुंबईतील गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेले हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहभागामुळे डीआरपीपीएलने मोठं पाऊल टाकलं आहे. डीआरपीपीएलने अमेरिकेतील सासाकी ही प्रसिद्ध आंतरशाखीय रचना फर्म आणि बुरो हॅपोल्ड ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी यांनाही आपल्या सोबत घेतले आहे. या दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात आहेत.  सासाकी कंपनीला ७० वर्षांचा वारसा असून कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील अशी शाश्वत रचना तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. तर बुरो हॅपोल्ड शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून तेथे सर्जनशील व मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

अदानी समूहाचा धारावीसाठी स्वतंत्र शौचालये, हवेशीर स्वयंपाकघर आणि कौटुंबिक वास्तव्यासाठी तसेच विश्रांतीसाठी परिपूर्ण खासगी घरांची निर्मिती, दुकानांचा उदय आणि भरभराट करणारे व्यवसाय त्याचप्रमाणे व्यावसायिक व नोकरीच्या संधींची निर्मिती आणि स्थानिक समुदायाची उन्नती यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे.  

डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ शहरी नूतनीकरण आणि पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन एवढाच नसून त्यापेक्षा अधिक आहे - धारावीतील संस्कृतीचा गाभा जोपासतानाच तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. जागतिक दर्जाच्या या अत्युच्च प्रयत्नांकडे आम्ही एकात्मता, सर्वसमावेशकता आणि सामुदायिक सहभागासाठीच्या वचनबद्धतेतून पाहतो. आम्ही आमच्या जागतिक दर्जाच्या भागीदारांचे कौशल्य आणि धारावीकरांचा उत्साह व चैतन्य यांच्यातील सुसंवादातून धारावीच्या नागरी पुनर्विकासाचे जगाचे लक्ष वेधून घेईल असे मॉडेल विकसित करण्याची अपेक्षा करतो, ज्याची अन्यत्र आणि शहरांमध्ये प्रतिकृती राबवली जाऊ शकते."

सन १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सिंगापूर गृहविकास मंडळाने १२ लाख घरांची चोखंदळपणे उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातून जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधा आणि एका प्रगतीशील समाजाची निर्मिती झाली. या प्रवासातून मिळालेल्या अनमोल कौशल्य व अनुभवांचा उपयोग करून त्यांचा समावेश आपल्या परिवर्तनीय प्रक्रियेत करण्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

Web Title: World famous designer will create master plan of Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.