मुंबई : मुंबईतल्या विस्तीर्ण पसरलेल्या चाळीचं रुपांतर आता गगनचुंबी इमारतींमध्ये झालंय. प्रत्येक ठिकाणच्या चाळी आता नामशेष होऊन त्याजागी मोठ्या आकाशाला टेकतील अशा इमारती तयार करण्यात आल्यात. त्यामुळे मुंबईत गेल्या काही वर्षांत गगनचुंबी इमारतींची संख्या वाढत गेली. मुंबईत अनेक कॉर्पोरेट ऑफिस वाढत गेल्याने बांधकाम व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले. त्यात मुंबईतल्या अनेक गिरण्या बंद पडल्या. बंद पडलेल्या गिरण्यांवर बांधकाम व्यावसायिकांनी आपला महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उभा केला. चाळीत राहणाऱ्यांनाही कात टाकून उंची आयुष्य जगण्याची इच्छा झाल्याने, मुंबईतल्या अनेक चाळींवर बुलडोझर फिरवला गेला आणि तिकडेही भल्यामोठ्या इमारती तयार झाल्या. मुंबईतील अशाच काही गगनचुंबी इमारतींविषयी आज पाहुया.
एम्पिरिअल टॉवर - ताडदेव
ताडदेव इथे असलेला एम्पिरिअल ट्वीन टॉवर हा मुंबईतील सर्वात उंच टॉवर आहे. या टॉवरची उंची २५४ मीटर असून ६० मजल्यांची ही इमारत आहे. पूर्वी याठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी होती. तसेच अनेक गिरण्याही होत्या. येथील झोपडपट्टी तोडून आणि गिरण्या हटवून इथे हा गगनचुंबी टॉवर बांधण्यात आला. हाफिझ या बांधकाम व्यावसायिकाचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, २०१० साली या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. या दोन्ही टॉवरना एस.डी. टॉवर असंही म्हटलं जातं.
वर्ल्ड वन, लोअर परळ
श्रीनिवास मिलच्या जागेवर उभा राहत असलेला वर्ल्ड वन हा टॉवर देशातील उंच टॉवरपैकी एक असणार आहे. २०१० साली या टॉवरचं बांधकाम सुरू झालं असून २०१८ पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. लोढा ग्रुपचा हा प्रोजेक्ट असून वर्ल्ड क्रेस्ट आणि वर्ल्ड व्ह्यू असे दोन उंच टॉवरही उभारण्यात आले आहेत. वर्ल्ड क्रेस्ट हा टॉवर २२२.५ मीटर उंच असून या टॉवरमध्ये ५७ माळे आहेत. २०१६ साली या टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं. मात्र वर्ल्ड वन आणि वर्ल्ड व्ह्यू या दोन टॉवरचं काम प्रगतीपथावर आहे. वर्ल्ड व्ह्यू हा टॉवर ८० मजल्यांचा असणार आहे. लोढा ग्रुपचा हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असल्याने मुंबईकरांचंही इथे लक्ष लागून राहिलेलं आहे.
आणखी वाचा - या ठिकाणी मुंबईकरांना हवाय त्यांचा 'सपनों का महल'
लोढा बेलीसीमो - महालक्ष्मी
लोढा ग्रुपचा हा दुसरा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट. २२२ मीटर उंच असलेला हा टॉवर ५३ मजल्यांचा आहे. या प्रोजेक्टमध्ये ५३ मजल्यांचे तीन विंग आहेत. २०१२ साली या टॉवरचं बांधकाम पूर्ण झालंय तर २०१४ साली या इमारतीचं लोकार्पण होऊन इमारत वापरात आली. कपाडिया असोसिएट्स या आर्किटेक्टने हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय.
ऑर्किड वूड्स - गोरेगाव
आकाशाला गवसणी घालणारा मुंबईतील ओर्किट वूड्स हा टॉवर म्हणजे गोरेगावची शानच आहे. डी.बी रिअॅल्टीचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट. ४००० एकर जागेत पसरलेले आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क या टॉवरमधून अगदी स्पष्ट दिसतं. ५५ मजल्यांच्या या इमारतीमध्ये आधुनिग सामुग्रीचा समावेश आहे. ओर्किड वूड्सच्या तीन इमारती असून तिनही इमारती ५५ मजल्यांच्या आहेत. २, २.५, ३ आणि ४ बीएचकेच्या रुम इकडे उपलब्ध आहेत.
इम्पेरिअल हाईट्स - गोरेगाव
वाधवा ग्रुपचा गोरेगावातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे इम्पेरिअल हाईट्स. ४७ मजल्यांचे दोन टॉवर असून या इमारतीच्या गच्छीवरुन मुंबईचा विस्तारलेला नजारा दृष्टीस पडतो. मढ-मार्वेचं अप्रतिम सौंदर्यही या टॉवरमधून दिसतं. त्यामुळे या टॉवरमध्ये राहणाऱ्यांना फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडण्याची गरजच नाही. आपल्या बाल्कनीत थोडा वेळ विसावलो तरीही मनमोहक दृष्य सहज दिसू शकतात.