मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेबाबतच्या सर्व आवश्यक सवयींचे पालन करणे आवश्यक आहे. यानिमित्ताने यंदा शाळा बंद असल्या व आॅनलाइन शिक्षण सुरू असले तरी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याच्या आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागृती करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे आणि गर्दी टाळणे या सवयींबरोबरच वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे याबद्दल सरकारकडून माहिती दिली जातच आहे. मात्र जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने या सवयींमुळे आजारांपासून बचाव कसा केला जाऊ शकतो हे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगणे अपेक्षित आहे. ‘क्लीन हंस फॉर आॅल’ याखाली सप्ताह साजरा करणे, हात धुण्याच्या सवयीची आवश्यक साधने प्रत्येक घटकाला उपलब्ध करून देणे, हा केवळ कार्यक्रम न राहता प्रत्येकासाठी नित्याची सवय बनणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून घरी हँडवॉशिंग कृती करून त्याचे फोटो काढावेत, चित्रीकरण करावे आणि ते पाठवण्यास सांगायचे आहे. हँडवॉशिंग चॅलेंजमध्ये हात धुण्याच्या ८ स्टेप्सनुसार ही प्रक्रिया २० सेकंदांत पूर्ण होणे आवश्यक असल्याची आठवण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. शिवाय याबाबत स्लोगन, कविता, निबंध, रांगोळी स्पर्धा यांचे वॉर्डस्तरावर आयोजन करण्याच्या सूचना शाळा, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी युनिसेफ आणि सीएसीआर यांच्या माध्यमातून एक वेबिनार घेण्यात येणार आहे. यावेळी हा उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या ५ शाळा, विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तिपत्रही देणार आहे. शाळांनी उपक्रमाचा अहवाल विभागाकडे सादर करणे आवश्यक असणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.