- स्नेहा मोरे
इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ नर्सेस ही संघटना दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने नवीन संकल्पना मांडत असते. यंदाची संकल्पना आहे, ‘नर्सिंग इज बॅलन्स आॅफ माइंड, बॉडी अँड स्पिरीट’. याचा अर्थ परिचार म्हणजे हा केवळ शारीरिक सेवाभाव नसून मन, शरीर आणि आत्म्याचा परिचार आहे. याचा समतोल साधून जो सेवाभाव साधला जातो, त्याचा अर्थ परिचार असा होय.वैद्यकीय सेवा क्षेत्रात परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय, या सेवेला पूर्णत्व मिळू शकत नाही. मात्र असे असूनही वास्तविकपणे परिचारिकांकडे कायमच दुर्लक्ष केलेले दिसून येते. परिचारिका या शाखेला आपल्याकडे चांगली प्रतिष्ठा आहे, मात्र ती जपणे आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या परिचारिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाºया अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका त्यांचे जीवन व्यतित करत आहेत, असे कामा व आल्बेस रुग्णालयाच्या अधिपरिचारिका संध्या निमसे यांनी सांगितले. देशात वाढती लोकसंख्या, सामाजिक-कौटुंबिक बदल, आजाराचे बदलते स्वरूप, वाढलेली आयुमर्यादा यामुळे रुग्णालये व परिचारिकांची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र सरकारी, निमसरकारी, खासगी, नर्सिग होम्स व पंचतारांकित सुपर स्पेशालिटी रुग्णालये या सर्व ठिकाणी परिचारिकांची संख्या मागणीपेक्षा खूप कमी आहे. देशात साडेचार लाख परिचारिका रुग्णसेवेचे कार्य करत आहेत. मात्र, रुग्णांच्या गरजेच्या तुलनेत ही संख्या निम्मी असल्याचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन व परिचर्या संशोधन विकास संस्थेच्या जनरल सेक्रेटरी कोमल वायकोळे यांनी सांगितले होते.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, विकसनशील देशांत परिचारिकांची टंचाई खूप भासते. भारतात तर सध्या चोवीस लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयांत परिचारिकांची संख्या कमी असल्याचे दिसते. भारतातून परदेशात स्थलांतर करणाºया परिचारिकांची संख्या जास्त आहे आणि देशात त्यांची कमतरता भासण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. भारतातील दुर्गम भागात डॉक्टर, परिचारिकांची कमतरता जास्त भासते. यावर उपाय म्हणून सरकार अधिकाधिक नर्सिंग कॉलेजेस काढण्याचा विचार करत आहे, पण तेवढेच करून भागणार नाही. परिचारिकांना इतर सुविधा देण्याचीही आवश्यकता आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे, त्याप्रमाणेच बदल करून या शाखेलाही अद्ययावत करण्याची गरज आहे.