जागतिक मानसिक आरोग्य दिन :कार्यालयीन ठिकाणीही मानसिक स्वास्थ्य जपणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:11 AM2017-10-10T03:11:20+5:302017-10-10T03:11:30+5:30

भेदाभेद, कामाचा तणाव, स्पर्धात्मक युग, शिफ्ट वर्किंग अशा एक ना अनेक कारणांनी कार्यालयीन ठिकाणी मानसिक स्वास्थ्य बिघडते. शिवाय, याचा परिणाम कुटुंबावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 World Mental Health Day: Important to maintain mental health at workplace | जागतिक मानसिक आरोग्य दिन :कार्यालयीन ठिकाणीही मानसिक स्वास्थ्य जपणे महत्त्वाचे

जागतिक मानसिक आरोग्य दिन :कार्यालयीन ठिकाणीही मानसिक स्वास्थ्य जपणे महत्त्वाचे

Next

मुंबई : भेदाभेद, कामाचा तणाव, स्पर्धात्मक युग, शिफ्ट वर्किंग अशा एक ना अनेक कारणांनी कार्यालयीन ठिकाणी मानसिक स्वास्थ्य बिघडते. शिवाय, याचा परिणाम कुटुंबावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे असल्याचे मत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मांडले आहे. जेणेकरून मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहिल्यास शारीरिक आरोग्यही निरोगी राहते, असा सल्ला ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दिला आहे.
कार्यालयीन ठिकाणी मानसिक स्वास्थ्याचा विचार होणे गरजेचे आहे, हीच यंदाची जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त निश्चित करण्यात आलेली संकल्पना आहे.
मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की आपल्याला वाटते- आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येप्रमाणे ‘आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर त्याजोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची पूर्णस्वरूप स्थिती असणे होय.’ या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशावरून त्याचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल.
ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल. या व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभाव दिसून येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीपाद अंबिके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे हल्लीच्या कॉर्पोरेट सेक्टर तसेच पोलीस, डॉक्टर अशा क्षेत्रांत सध्या मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. काही कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये योगा, व्यायाम अशा उपक्रमांसाठी विशेष वेळ राखून ठेवली जाते त्याप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी कृतिशील उपक्रम आखले पाहिजेत, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.

Web Title:  World Mental Health Day: Important to maintain mental health at workplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य