मुंबई - एकीकडे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असताना मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने सफाई मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत साडेसात महिन्यांच्या कालावधीत मलेरिया वाहक सात हजार ९२२ तर डेंग्यू वाहक ३९ हजार ४८१ डासांचे अड्डे नष्ट केले आहेत.
एडिस एजिप्ती' डासामुळे डेंग्यू या आजाराचा प्रसार होतो. तर ऍनॉफिलीस स्टिफेन्सी या डासामुळे डेंग्यू होतो. ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत मलेरियाचे ३९५ रुग्ण तर डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागामार्फत जानेवारीपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच कालावधीत डासांची संभाव्य उत्पत्ती स्थळे ठरु शकणारे १२ हजार ३८ टायर्स आणि दोन लाख ८० हजार ९८७ इतर टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या.
अशी वाढते डासांची उत्पत्ती
डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान तीन आठवड्यांचे असते. या कालावधीत मादी डास किमान चारवेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होत असतात. हे डास डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.
हे ठरू शकतात डासांचे अड्डे
इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभीवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या आदी ठिकाणी साचलेल्या पाण्यात अशा डासांची पैदास होत असते.
शुक्रवारी जागतिक डास दिन
२० ऑगस्ट १८९७ रोजी तत्कालीन भारतीय वैद्यकीय सेवेतील डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया या रोगाचा प्रसार डासामुळे होतो, ही बाब सिद्ध केली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक डास दिन पाळला जातो.