जगाने गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज - अब्दुल नबी अल शोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:09 AM2020-01-15T05:09:16+5:302020-01-15T05:09:29+5:30

‘लोकमत’ कार्यालयाला दिली सदिच्छा भेट : ‘गांधीजी - इस्लाम व अरबी जगत’ हे पुस्तक लवकरच हिंदी, इंग्रजीमध्ये येणार

The world needs to bring Gandhiji's thoughts into practice - Abdul Nabi Al Shola | जगाने गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज - अब्दुल नबी अल शोला

जगाने गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज - अब्दुल नबी अल शोला

Next

मुंबई : जगाला शांतीचा व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार अजरामर असून जगाने गांधी विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत बहारीनचे माजी मंत्री व ‘गांधीजी-इस्लाम व अरबी जगत’ या पुस्तकाचे लेखक अब्दुल नबी अल शोला यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शोला यांनी अरबी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाची दुसरी प्रत लवकरच बाजारात येणार असून पुढील काही दिवसांत हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेत हे पुस्तक भारतात प्रकाशित होईल. चार वर्षे अभ्यास व संशोधन करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या विषयावरील अरबी भाषेतीलच नव्हेतर, कुठल्याही भाषेतील हे पहिले पुस्तक आहे, असा दावा त्यांनी केला. या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींचा बालपणापासूनचा प्रवास वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. गांधीजी व अरबी जगाचा कसा संबंध होता. गांधी विचार कसे विकसित होत गेले यावर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

महात्मा गांधी ही भारताला मिळालेली फार मोठी देणगी आहे. भारताच्या तत्कालीन नेत्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे देशात विविधतेत
एकता राहू शकली. भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही प्रक्रिया राबवणारा देश म्हणून कार्यरत राहू शकला. धर्माच्या आधारावर चालणाऱ्या देशांना अनेकदा विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

भारत व पाकिस्तान एकाच
वेळी स्वातंत्र झाले; मात्र भारत व पाकिस्तानची सद्य:स्थिती पाहिल्यावर या दोन्ही देशांमधील फरक ठळकपणे समोर येतो, असे ते म्हणाले. धर्माचा राजकारणातील वापर कमी होण्याची गरज आहे. धार्मिक आधारावरील भेदभाव अत्यंत चुकीचे आहेत. हिंदू व मुस्लीम धर्मांमध्ये अनेक समानता आहेत. काही असमानतादेखील आहेत; मात्र दोन्ही धर्मांचा पाया समान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदू धर्मात शांतीचा संदेश अनेकदा आला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

या पुस्तकाला अरबी जगतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास, महात्मा गांधीजींची शिकवण व त्यांच्या विचारांच्या माध्यमातून जागतिक शांतता नांदू शकेल, अशी शिकवण जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अरबी जगातील नागरिकांना महात्मा गांधींच्या विचारांबाबत माहिती देणे, शांततेचे महत्त्व, गांधींनी ब्रिटिश राजवटीविरोधात लढून कशा प्रकारे अहिंसा व शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले यामधून प्रेरणा घेण्यासाठी व अहिंसा व शांततेचे महत्त्व अधोरेखित करण्यास हे पुस्तक लाभदायक ठरेल, असा दावा त्यांनी केला.

गल्फ को-आॅपरेशन कौन्सिल (जीसीसी) या मध्य पूर्वेतील सहा देशांमध्ये १ कोटीपेक्षा अधिक भारतीय वास्तव्य करतात व या देशांच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे, हा गांधीजींच्या तत्त्वांचाच परिणाम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बहारीनमध्ये असलेल्या २००

वर्षे जुन्या मंदिराला नरेंद्र मोदी
यांनी त्यांच्या दौºयात भेट दिली होती. भारत हा बहारीनसोबत सुरुवातीपासून आहे. गांधीजींनी अरब देशांसोबत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली होती, या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

Web Title: The world needs to bring Gandhiji's thoughts into practice - Abdul Nabi Al Shola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.