प्रमाण गुणोत्तराचे समीकरण दूरच, यंत्रणांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ नर्सेसच्या गुणोत्तराप्रमाणे सात रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण आहे. मात्र राज्यासह मुंबईत परिचारिकांच्या प्रमाण गुणोत्तराचे समीकऱण दूरच राहिले आहे, याखेरीज वास्तवात सध्या ७० रुग्णांमागे एक परिचारिका कोरोनाच्या खडतर काळातही अहोरात्र सेवा बजावित आहे. राज्यासह मुंबईतील परिचारिकांनी वेळोवेळी पदभरती, प्रलंबित मागण्यांविषयी यंत्रणांना साकडे घातले आहे, परंतु या परिचारिकांच्या पदरी निराशाच आल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या काळात संसर्गासह अनेक शारीरिक, मानसिक समस्यांना परिचारिका तोंड देत आहेत. याशिवाय, मनुष्यबळामुळे मुंबईसह राज्यातील सर्वच परिचारिकांवर कामाचा ताण पडत आहे. 'अवेळी जेवण, कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोल्यांची दुरवस्था, पाळणाघराचा अभाव, रिक्त पदे, रुग्णालयात साधनसामग्रीचा अभाव, अनेक मशीन नादुरुस्त... अशा अनेक समस्यांना तोंड देत आजही परिचारिका चेहऱ्यावर हास्य ठेवत रुग्णांना आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 'दोन ते तीन परिचारिकांना ७० रुग्णांची करावी लागणारी सुश्रूषा, या वाढत्या कामाच्या ताणामुळे सध्या परिचारिकांना पाठ व मणक्याचा त्रास, क्ष-किरणांमुळे प्रसूतीच्या अडचणी, रक्तक्षय तसेच संसर्गजन्य वातावरणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे', अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गजबे यांनी दिली आहे. त्यामुळे आता परिचारिकांचे योगदान लक्षात घेऊन राज्य शासनाने त्वरित आमच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अशी आमची मागणी आहे.
कोरोना काळात सेवा देण्याचे परिचारिकांसमोर कठीण आव्हान आहे. त्यात पीपीई कीट्स घालून वर्षभराहून अधिक काळ काम करणे कुणाहीसाठी सोपी गोष्ट नाही. अशा स्थितीत कामाच्या ठिकाणी कर्तव्यनिष्ठ राहताना, दुसरीकडे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही या परिचारिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
याविषयीचा खडतर अनुभव सांगताना परिचारिका कामिनी गंगावणे यांनी सांगितले की, कोरोना कक्षात काम करताना सुरुवातीला अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं. परंतु, त्यावेळेस रुग्णाचा जीव वाचविण्याला कायम प्राधान्य दिले. आता तुलनेत हा लढा सोपा झाला असला तरी, आम्ही शारीरिक, मानसिकरित्या थकलोय. हा मानसिक-शारीरिक ताण सहन होत नाहीये. शिवाय, बऱ्याचदा यंत्रणांकडे याविषयी पाठपुरावा करूनही दाद मिळत नाही, ही सल कायम आहे.
परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या....
* नियमित पदभरती व सर्व स्तरांवरची पदोन्नती
* केंद्र शासनामागे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करणे
* परिचारिकांसाठी उपचार
* संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासावर विनाविलंब कार्यवाही करावी
* केंद्र शासनामागे परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल
* परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचे काम देणे
* परिचारिकांच्या उच्चपदावरील अतिक्रमण थांबविणे
* नर्सिंग स्कूल व महाविद्यालयातील पदे तात्काळ भरणे